आवश्यक निधी तातडीने उपलब्ध करुन देणार – उपमुख्यमंत्री अजित पवार यांची ग्वाही
Summary
मंदिर संकुल संवर्धनाबाबत बैठकीत आढावा ऐतिहासिक मंदिराला शोभेल अशी दर्जेदार कामे करण्याच्या सूचना पुणे, दि. 16 : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली, […]
मंदिर संकुल संवर्धनाबाबत बैठकीत आढावा
ऐतिहासिक मंदिराला शोभेल अशी दर्जेदार कामे करण्याच्या सूचना
पुणे, दि. 16 : जेजुरी तीर्थक्षेत्र विकासासाठी तयार करण्यात आलेल्या 349 कोटी रुपयांच्या आराखड्यापैकी पहिल्या टप्प्यातील जतन व संवर्धन, परिसर व्यवस्थापन, जलव्यवस्थापन आदी विकासकामांसाठी मान्यता देण्यात आली, तसेच पहिल्या टप्प्यांतील विकास कामांसाठी तातडीने निधी उपलब्ध करुन देण्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली जेजुरी तीर्थक्षेत्र विकास आराखडा आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार सुप्रियाताई सुळे, आमदार संजय जगताप, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख तसेच विविध विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार पुढे म्हणाले, जेजुरी गडाला सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे. हे जागृत देवस्थान असून इथे राज्यातून आणि परराज्यातून लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात. जेजुरीच्या वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व ओळखून विकासाचे नियोजन करा. विकास कामे करताना कमीत कमी वेळेत काम पूर्ण होईल याची दक्षता सर्व विभांगांनी घ्यावी. विश्वस्त आणि स्थानिक लोकांना विश्वासात घेऊन सर्व विभागांनी विकासाची कामे करावीत. मंदिर परिसराचा जीर्णोध्दार करताना मूळ मंदिरामध्ये बदल न होऊ देता जुन्या पद्धतीचा दृष्टीकोन समोर ठेऊन विकास कामे करण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
तीर्थक्षेत्र विकासामुळे स्थानिक लोकांना रोजगार मिळेल, तसेच भाविक येण्याचे प्रमाण वाढेल. पाण्याच्या साठवण ठिकाणांची स्वच्छता करुन वेगळी पाईपलाईन करुन त्याचा वापर करता येईल. गडावर उधळली जाणारी हळद रसायन मिश्रीत असल्याने सर्वांच्या आरोग्यासाठी घातक आहे. रसायन मिश्रीत भंडाऱ्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांबाबत कठोर भूमिका घ्यावी, असे सांगून गडाला शोभेल अशी सीमाभिंत बांधा, पाण्याची टाकी, पदपथ, शौचालय, तलावातील गाळ काढणे, माहिती फलक इत्यादी कामांचा आढावा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी घेतला.
यावेळी नियोजन विभागाच्यावतीने गडाचे ऐतिहासिक महत्त्व आणि वास्तूचा इतिहास, यात्रा-उत्सव तसेच दरवर्षी गडावर येणाऱ्या भाविकांची संख्या, आपत्ती निवारण मार्गदर्शक तत्त्वे, संवर्धनासाठी मार्गदर्शक तत्त्वे, कमानी, दीपमाळा व कोटाचा बाहेरच्या भागाची वास्तुसंवर्धनाची गरज, महादरवाजे, पाणीगळती डागडुजी, तुटलेले दगड परत बसविणे, खराब चुन्यांच्या गिलाव्याची डागडुजी, भेगा सांधणे, गडावरील झुडपे, गवत शास्त्रीय पद्धतीने काढणे, हळद व तेलाचे थर काढणे, पर्यटक/भाविकांसाठीच्या सुविधांबाबत सादरीकरणाद्वारे माहिती दिली.