मराठवाड्याच्या विकासाशी संबंधित योजना तातडीने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड
Summary
औरंगाबाद, दि. 6 (विमाका) – मराठवाडयाच्या विकासाशी संबंधित योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आणि विविध विभागांचे केंद्र शासनाकडे प्रलंबित असणारे विषय वेळेत मार्गी लावण्याकरीता पाठपुरावा केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले. विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज […]
औरंगाबाद, दि. 6 (विमाका) – मराठवाडयाच्या विकासाशी संबंधित योजना तातडीने पूर्णत्वास नेण्यासाठी आणि विविध विभागांचे केंद्र शासनाकडे प्रलंबित असणारे विषय वेळेत मार्गी लावण्याकरीता पाठपुरावा केला जाईल, असे केंद्रीय अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी सांगितले.
विभागीय आयुक्त कार्यालयाच्या सभागृहात आज मराठवाडयात राबविल्या जाणाऱ्या महत्त्वाच्या योजना / विकास कामे, केंद्र शासनाकडे प्रलंबित विषय, विविध विभागामार्फत केंद्र शासनाकडे पाठवावयाचे नवीन प्रस्ताव या विषयांवर डॉ. कराड यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पाडली. बैठकीस विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, महापालिकेचे प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय, उपायुक्त जगदीश मिनीयार, शिवाजी शिंदे, वनसंरक्षक सत्यजित गुजर, आरोग्य विभाग औरंगाबादचे उपसंचालक डॉ. स्वप्नील लाळे, आरोग्य विभाग लातुरचे उपसंचालक डॉ. एकनाथ माले, रेल्वेचे उपमुख्य परिचालन प्रबंधक सुरेश सोनवणे, राज्य रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी अभियंता सुरेश अभंग, महावितरणचे मुख्य अभियंता भुजंग खंदारे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता एस.एस.भगत, आदींसह उदयोग, बँक, पुरातत्व विभागाचे अधिकार उपस्थित होते.
मराठवाड्यातील रेल्वे मार्गांचे विदयुतीकरण, दुहेरीकरण आणि नवीन प्रस्तावित मार्गांची कामे प्राधान्याने मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केला जाईल, असे सांगून डॉ. कराड म्हणाले की, औरंगाबाद-अहमदनगर रेल्वे मार्गाचा विकास आराखडा तयार करावा. मनमाड-परभणी हा दुहेरी रेल्वे मार्ग करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. याशिवाय औरंगाबाद-चाळीसगाव, जालना खामगाव, रोटेगाव-कोपरगाव या नवीन रेल्वे मार्गांसाठी पाठपुरावा केला जाईल. शेतकऱ्यांच्या सुविधेसाठी ग्रामीण भागात विविध राष्ट्रीयकृत बँकांच्या नविन शाखा सुरू करण्यासाठी निश्चित प्रयत्न केला जाईल. औरंगाबाद विभागात एम्सचे रुग्णालय सुरू करण्यासाठी प्रस्ताव सादर करावा. औरंगाबाद येथे राष्ट्रीय पर्यटन विद्यापीठ सुरू करण्यासाठी प्रयत्न केला जाईल. आयआयटी पवईची शाखा औरंगाबाद विभागात स्थापन करण्यासाठी प्रस्ताव द्यावा. औरंगाबाद विमानतळाचे विस्तारीकरण तातडीने पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला जाईल. याशिवाय विभागातील प्राचीन स्मारके संवर्धनासाठी प्रयत्न केला जाईल. अजिंठा, दौलताबाद येथे रोप वे तयार करण्यासाठी सर्वेक्षण करावे. याशिवाय घृष्णेश्वर, अहिल्यादेवी कुंड, दौलताबाद, या ठिकाणी साऊंड व लाईटची सुविधा उपलब्ध करण्याकरिता बँकांच्या सीएसआर फंडातून निधी उपलब्ध करुन दिला जाईल.
यावेळी बैठकीत औरंगाबाद येथे नॅशनल इन्स्ट्यिुट ऑफ आर्किटेक्चर सुरू करण्याबाबतच्या प्रस्तावाची सद्यस्थिती, औरंगाबाद येथील बाबा पेट्रोल पंप ते विमानतळ दरम्यान उड्डाणपुलाचे बांधकाम, नगर नाका ते दौलताबाद टी पाँईट रस्त्याचे चौपदरीकरण, दौलताबाद बायपासची सद्यस्थिती, परभणी शहर वळण रस्ता, राहटी जि.परभणी येथे पूर्णा नदीवर ब्रिज कम बॅरेज बनविणे, ऑट्रम घाटातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, औरंगाबाद येथे जिरियाट्रीक्स सेंटर स्थापित करणे आदी विषयांचा डॉ.कराड यांनी आढावा घेतला.