सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील जलसिंचन बळकटीकरणासाठीची कार्यवाही तातडीने करावी – महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार पूर्णा नदीच्या पात्रात 5 नवीन बॅरेजेस , सोयगाव तालुक्यात सिंचनाचे नवीन प्रकल्पसाठी सर्वेक्षणाचे दिले निर्देश
Summary
सिल्लोड , दि.21, :- सिल्लोड-सोयगाव तालुक्यासह आसापासच्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्यासोबत जलसिंचन बळकटीकरणासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिन विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथिल बैठकीत दिले. गुरुवार ( दि.20 ) […]

सिल्लोड , दि.21, :- सिल्लोड-सोयगाव तालुक्यासह आसापासच्या सर्व गावांमध्ये मुबलक पाणीसाठा उपलब्ध होण्यासोबत जलसिंचन बळकटीकरणासाठीची आवश्यक कार्यवाही तातडीने करण्याचे निर्देश महसूल, ग्रामविकास, बंदरे, खार जमिन विकास, विशेष सहाय्य राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद येथिल बैठकीत दिले.
गुरुवार ( दि.20 ) रोजी औरंगाबाद येथील गोदावरी महामंडळाच्या सिंचन भवन येथे आयोजित सिल्लोड – सोयगाव तालुक्यातील जलसिंचन आढावा बैठकीत राज्यमंत्री श्री. सत्तार बोलत होते. या बैठकीस के. बी. कुलकर्णी, कार्यकारी संचालक, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औरंगाबाद, डी.बी. तवार, मुख्य अभियंता, जलसंपदा विभाग औंगाबाद, मनोज अवलगावकर,अधीक्षक अभियंता, गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ औंगाबाद,तसेच जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती किशोर बलांडे, समाजकल्याण सभापती राजू राठोड, सिल्लोड चे उपनगराध्यक्ष अब्दुल समीर, यांच्यासह संबंधित सर्व यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी राज्यमंत्री श्री.सत्तार म्हणाले, सिल्लोड तालुक्याच्या क्षेत्रफळानुसार हक्काचे पाणी तालुक्यास मिळालेच पाहिजे त्यादृष्टीने सर्व संबंधित यंत्रणांनी परस्पर समन्वयातुन तालुक्याला आवश्यक पाणीसाठा उपलब्ध करुन देण्यासाठीची कार्यवाही कालमर्यादेत पूर्ण करावी. जेणेकरुन येत्या पावसाळ्यातील पाण्याचा योग्य साठा होईल असे निर्देशित करुन श्री.सत्तार यांनी सिल्लोडची भौगोलिक, नैसर्गिक परिस्थिती लक्षात घेऊन येथील शेतकऱ्यांना दिलासादायक सिंचन व्यवस्था निर्माण करणे गरजेचे असून त्या दृष्टीने सिल्लोड-सोयगाव परिसरातील क्षेत्राचे सर्वेक्षण करुन तातडीने संबंधितांनी पर्यायी पाणीसाठ्याबाबतचे प्रकल्प अहवाल सादर करावेत. ज्याच्या माध्यमातून शासनाकडे तालुक्यासाठीच्या पर्यायी पाणीसाठ्याची मागणी करता येईल. त्याचप्रमाणे मान्यता मिळालेल्या मात्र काम सुरू न झालेल्या, मान्यता रद्द झालेल्या इतर धरण, प्रकल्पातील तसेच इतर पाणीसाठ्यांमधील पाणी सिल्लोडच्या जलसिंचनासाठी वापरता येईल या दृष्टीने माहिती संकलन करुन त्याप्रमाणे प्रस्ताव सादर करावा, खेळना प्रकल्पाची उंची वाढविण्याच्या प्रलंबित प्रस्तावाबाबत आढावा घेऊन त्याबाबतचा अहवाल सादर करण्याचे निर्देश श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.
तसेच सोयगाव-सिल्लोड क्षेत्रातील मध्यम प्रकल्पाच्या धरण, पाणी साठ्याच्या जमिनीची मोजणी करुन सिमा निश्चिती करुन घ्याव्यात. ज्या ठिकाणी या जागेत अतिक्रमण केलेले असेल ते तातडीने हटवून संबंधित यंत्रणांनी ती जागा ताब्यात घ्यावी. तसेच खेळना, अंजिंठा, सोयगाव, केळगाव यासह इतर प्रकल्पातील सर्व गाळ काढून शेतकऱ्यांना तो वाटून द्यावा. जेणे करुन जमिनीची सुपिकतेत त्याचसोबत धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल. सर्व यंत्रणांनी शेतकऱ्यांना मध्यवर्ती ठेवून जलसिंचनाची पर्यायी व्यवस्था उभारण्याच्या कामाला प्रथम प्राधान्य देत आवश्यक कार्यवाही तत्परतेने करण्याचे निर्देश श्री.सत्तार यांनी यावेळी दिले.
——————————————-
सिल्लोड- सोयगांव हा अवर्षणग्रस्त व सिंचन अनुशेष असणारा मतदार संघ आहे. राज्यातील मराठवाडा व उत्तर महाराष्र्टाच्या सीमेवरील व तापी आणि गोदावरी नदी खोर्यात विभागलेल्या या प्रदेशातून पुर्णा व ईतर नद्या उगम पावतात पण पिण्यासाठी व शेतीसाठी किमान गरजेचे पाणी देखिल मिळत नाही.
याबाबत राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी सदरील बाब गांभीर्याने घेत अधिकाऱ्यांनी आता जलक्रांती घडवून आणण्यासाठी पुढे आले पाहिजे असे मत व्यक्त करून यासाठी सरकार कडून निधी कमी पडणार नाही अशी ग्वाही यावेळी दिली.
————————————–
सिल्लोड तालुक्यातील भराडी प्रकल्पाची मंजुरी रद्द झाल्याने त्या पाण्याच्या उपलब्धतेतुन सिल्लोड तालुक्यातील पुर्णा नदीच्या पाञात ५ बॅरेजेस बांधण्याच्या कामांचे सर्व्हेक्षणाचे काम तात्काळ पुर्ण करावे, अजिंठा,शिवना डोंगराजवळील भाग,नाणेगांव,तोंडापुर,ठाणा, जंगलतांडा या ठिकाणी वाहून जाणार्या पाण्याला आडविण्यासाठी नविन प्रकल्प होवू शकतात. याकरीता तात्काळ ८ दिवसांत आवश्यक सर्व्हेक्षण पुर्ण करावे,सिल्लोड- सोयगांव मतदार संघातील पुर्ण झालेल्या जुन्या प्रकल्पांत संकल्पनाप्रमाणे व वाढीव जलसंचय व्हावा यासाठी कांही सुधारणा व विस्तार केला तर पावसाचे पाणी वाहून न जाता उपयोगात आणता येईल .यासाठी खेळणा प्रकल्पाची उंची वाढवणे व मजबूत गेट बसविणे, रावळा प्रकल्पातून वाहून जाणार्या पाण्यासाठी आवश्यक ती उपाययोजना ८ दिवसांत करावी,सिल्लोड- सोयगांव तालुक्यातील पुर्ण झालेल्या सिंचन प्रकल्यांसाठी शासनाने संपादीत केलेल्या जमिनीवर असणारी सर्व अतिक्रमणे तात्काळ हटवावीत आदी निर्देश राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिलेत.