महाराष्ट्र वाशिम हेडलाइन

साथीच्या आजारांवरील उपचारासाठी पुरेसा औषधसाठा उपलब्ध ठेवा – पालकमंत्री शंभूराज देसाई कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम अधिक गतिमान करण्याच्या सूचना

Summary

वाशिम, दि. १३ (जिमाका) : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. जिल्ह्यात साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच हे आजार पसरू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश […]

वाशिम, दि. १३ (जिमाका) : पावसाळ्याच्या दिवसात दूषित पाण्यामुळे साथीचे आजार पसरतात. जिल्ह्यात साथीच्या आजारांची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये पुरेशा प्रमाणात औषधसाठा उपलब्ध ठेवावा. तसेच हे आजार पसरू नयेत, यासाठी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती, लसीकरण व पिकांची स्थिती याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज, १३ जुलै रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित बैठकीत ते बोलत होते.

यावेळी जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहाय्यक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाचे उपसंचालक श्री. ठोंबरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, येत्या १५ जुलैपासून आठवी ते बारावी पर्यंत शाळा सुरू करण्याबाबत राज्य शासनाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार जिल्ह्यात आवश्यक कार्यवाही करावी. तत्पुर्वी शासकीय व खाजगी शाळेतील सर्व शिक्षकांचे लसीकरण पूर्ण करावे. कोरोनाचा संसर्ग कमी झाला असला तरी तिसर्‍या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात. जिल्ह्यात लागू असलेल्या कोरोना विषयक मार्गदर्शक सूचनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. नॉन-कोविड रुग्णांवर सुद्धा चांगल्या प्रकारे उपचार करण्यात यावे. कोणत्याही रुग्णाची तक्रार येणार नाही, याबाबतची दक्षता घ्यावी, असे पालकमंत्री यावेळी म्हणाले.

जिल्ह्यात पिकांची स्थिती चांगली आहे, ही आनंदाची बाब आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, अतिवृष्टीने जर शेतकऱ्यांचे नुकसान झाले तर तात्काळ दखल घेऊन पंचनामे करण्यात यावे. नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मदत करता येईल. जिल्ह्यात पात्र व्यक्तींचे तातडीने लसीकरण पूर्ण करण्यात यावे. ज्यांनी पहिला डोस घेतला आहे त्यांना विहित कालावधीत दुसरा डोस देण्यात यावा. यासाठी संबंधित यंत्रणेने व्यक्तीशी संपर्क साधून दुसरा डोससाठी त्या व्यक्तीला प्रोत्साहित करावे. जिल्ह्यात उभारण्यात आलेले प्राणवायू प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यरत राहतील. त्यामध्ये कोणतीही तांत्रिक अडचण येणार नाही, याकडे लक्ष द्यावे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगिलते.

जिल्हाधिकारी षण्मुगराजन म्हणाले, जिल्ह्यात कोरोना परिस्थिती नियंत्रणात आहे. दररोज सरासरी १२०० व्यक्तींच्या कोरोना चाचण्या करण्यात येत आहे. जिल्ह्यात लसीकरण मोहीम गतिमान करण्यावर भर दिला जात असून ३ लाख १५ हजार पात्र व्यक्तींना पहिला डोस देण्यात आला आहे. जिल्ह्यातील रुग्णालयांचे फायर ऑडिटच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधीची तरतूद करण्यात येईल. जिल्ह्यात चांगला पाऊस झाल्यामुळे पिकांची स्थिती चांगली असल्याचे त्यांनी सांगितले.

जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती पंत म्हणाल्या, पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजारांची शक्यता लक्षात घेता आरोग्य संस्थेमध्ये पुरेसा औषधसाठा उपलब्ध असून पिण्याचे पाणी दूषित झाल्यास पाण्याचे निर्जंतुकीकरण करण्यासाठी गावपातळीवर आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत आहे. १५ जुलैला आठवी ते बारावी पर्यंतचे वर्ग सुरू होणार असल्याने संबंधित शिक्षकांचे लसीकरण करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.

जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच कोरोनाविषयक मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीविषयी पोलीस अधीक्षक श्री. परदेशी यांनी यावेळी माहिती दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *