संपादक रवींद्र तहकीक यांच्यावर हल्ला करणार्यांविरूद्ध पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत कार्यवाही करा. • प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्राची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Summary
मुंबई- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.३० मे २०२१:- दैनिक लोकपत्रचे संपादक श्री. रवींद्र तहकीक यांच्यावर झालेला हा हल्ला वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर हल्ला असून, लोकशाहीस बाधक व प्रचलित कायद्याविरूद्ध आहे. जर या लिखाणाविषयी ज्या कोणास आक्षेप असेल, त्यांनी न्यायालयात जाऊन संबंधिताविरूद्ध कायदेशीर […]
मुंबई- विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि.३० मे २०२१:-
दैनिक लोकपत्रचे संपादक श्री. रवींद्र तहकीक यांच्यावर झालेला हा हल्ला वृत्तपत्रांच्या स्वातंत्र्यावर हल्ला असून, लोकशाहीस बाधक व प्रचलित कायद्याविरूद्ध आहे. जर या लिखाणाविषयी ज्या कोणास आक्षेप असेल, त्यांनी न्यायालयात जाऊन संबंधिताविरूद्ध कायदेशीर कार्यवाही करण्याचा मार्ग मोकळा होता. मात्र असे न करता त्यांनी संपादक व त्यांच्या कार्यालयावर जो भ्याड हल्ला केला आहे, त्याचा प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्र जाहीर निषेध करीत असून, या हल्ल्या प्रकरणी गुन्हेगारांना तात्काळ अटक करून पत्रकार संरक्षण कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करून कडक शासन करण्याची मागणी प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्राचे अध्यक्ष, इलियास खान, जनरल सेक्रेटरी विजयकुमार सकलेचा, दिलीप राठी, किशनभाऊ हसे, उपाध्यक्ष, कल्याण अन्नपुर्ने, प्रशांत वाघमारे, संजय भरतीया, सचिव अकरमखान पठाण, कोषाध्यक्ष आनंद श्रीवास्तव, सदस्य शेख सईद अकबर, किशोर गुंजाळ, नरेश थाबर्डे, अफसरखान पठाण, अमृत तारो, शेख मोबीन सहेबलाल, कृष्णा पठाडेसह प्रेस कॉन्सिल ऑफ महाराष्ट्राचे सर्व सभासदांनी केली आहे.
उपरोक्त विषयी विनंती करण्यात येते की, दैनिक लोकपत्र औरंगाबादचे संपादक श्री. रवींद्र तहकीक यांनी शेंदाड नार्याचा भयताड पोर्या गांजा मारतोय की चपट्या कोय या मथळ्याखाली दैनिक लोकपत्रमध्ये लेख छापला. यात श्री. रवींद्र तहकीक यांनी राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे आणि त्यांच्या पुत्रावर भाष्य केलेले आहेत. तसेच नितेश राणे यांनी छत्रपती संभाजीराजे यांच्यावर केलेल्या टिके संदर्भात सविस्तर विश्लेषण केले होते.
हे लिखाण वादग्रस्त असल्याचे आरोप करून राणे समर्थकांकडून लोकपत्रच्या कार्यालयात गोंधळ घालण्यात आला व संपादक श्री. रवींद्र तहकीक यांना धक्काबुक्की करून अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करण्यात आली व श्री. तहकीक यांना काळं फासण्यात आले आहे. या सर्व घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.