BREAKING NEWS:
महाराष्ट्र सातारा हेडलाइन

वृक्ष लागवड आणि संपूर्ण स्वच्छता मोहिम युद्धपातळीवर राबवा -विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

Summary

सातारा दि. १५ :  निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्‍पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळराणे या ठिकाणी विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या […]

सातारा दि. १५ :  निसर्गाची अनिश्चितता संपवायची असेल तर मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घेवून ग्रीन इम्‍पॅक्ट तयार करा. धरण क्षेत्रात आणि उजाड डोंगर, माळराणे या ठिकाणी विविध शासकीय योजना, कंपन्यांचा सामाजिक उत्तरदायित्व निधी आदी माध्यमातून वृक्ष लागवड मोहिम मोठ्या प्रमाणावार राबवा, असे सांगून प्लॅस्टिक निर्मुलन उपक्रम हाती घेवून संपूर्ण स्वच्छता माहिमेही युध्द पातळीवर राबवा, असे निर्देश विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालय सातारा येथे विभागीय आयुक्त पुणे यांच्या अध्यक्षतेखाली टंचाई परिस्थिती आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी  जितेंद्र डुडी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगरपालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल अधिकारी निलीमा धायगुडे, निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, जलसंपदा विभागाचे अरुण नाईक आणि जयंत शिंदे, उपजिल्हाधिकारी विक्रांत चव्हाण, विजया यादव, जिल्हा पुरवठा अधिकारी वैशाली राजमाने, यांच्यासह प्रातांधिकारी, तहसिलदार, गटविकास अधिकारी, नगरपरिषदांचे मुख्याधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा घेवून डॉ. पुलकुंडवार म्हणाले, आपल्याकडे मोठ्या प्रमाणावर उजाड डोंगर, वैराण माळराणे दिसत आहेत. ती हिरवीगार करा. वनविभागासह सर्व यंत्रंणानी पुढाकार घेूवन मोठ्या प्रमाणावर पुन्हा नवीन झाडे लावली पाहिजेत ती जगवली पाहिजेत आणि संवर्धित केली पाहिजे. याबरोबरच अनेक ठिकाणी रस्त्याच्या कडेला मोठ्या प्रमाणावर असलेल्या प्लॅस्टिकच्या पिशव्या, कचरा, घाण ही आपल्या डोळ्याला खटकली पाहिजे. आपण समाजाचा घटक आहोत. देशाचा नागरिक आहोत. आपला परिसर आपला गाव स्वच्छ ठेवणे ही आपली जबाबदारी आहे याची जाणीव ठेवून संपूर्ण स्वच्छता मोहिम राबवा. पुढच्या पिढीसाठी प्लॅस्टिक घातक आहे याची जाणीव ठेवून कोणाचेही भय न बाळगता प्लॅस्टिकचे अनधिकृत साठे विक्री उत्पादन आदी ठिकाणी मोठया प्रमाणावर छापे टाका आणि प्लॅस्टिक निर्मुलनाची मोहिम युद्ध पातळीवर राबवा.

प्लॅस्टिक माणसांच्या आणि जनावरांच्या शरीरात पोहचले आहे. पाणी अन्न प्रदुषित होत आहे. हे दुष्ट चक्र तोडण्यासाठी सर्वांनी या मोहिमेमध्ये झटून सहभागी व्हा, असे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सातारा जिल्ह्यामध्ये यावर्षी जलसिंचन विभागाने अनेक ठिकाणाची गळती काढण्याचे काम केले आहे. त्यामुळे पाण्याच्या दोन आवर्तनामधील  कालावधी वाढून शेवटच्या घटकापर्यंत व्यवस्थितपणे पाणीपुरवठा झाला आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी या बैठकीत दिली असता विभागीय आयुक्त डॉ. पुलकुंडवार यांनी सातारा जिल्ह्यात हे काम अत्यंत महत्त्वाचे व प्रभावी झाले असल्याचे सांगून त्यामुळे इतर कालव्यांची पाण्याची गळती काढून शेवटच्या घटकापर्यंत पाणीपुरवठा व्हावा, यासाठी शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल असे सांगितले.

चारा डेपो/ चारा छावणी मागणीचे फलटण तालुक्यातील नाईकबोमवाडी आणि सासवड या दोन ठिकाणचे प्रस्ताव शिफारशीसही शासनाच्या मंजुरीसाठी पाठविण्यात आल्याचेही डॉ. पुलकुंडवार यांनी यावेळी सांगितले.

या बैठकीत जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सातारा जिल्ह्यातील टंचाई स्थितीचा आढावा सादर केला यामध्ये त्यांनी मे 2024 मध्ये जिल्ह्यात टंचाई ग्रस्त गावे 210, आणि वाड्या 694 असून 3 लाख 25 हजार 156 बाधित लोकसंख्या आहे तर 2 लाख 8 हजार 806 बाधित पशुधन आहे. या साऱ्यांना 199 टँकरर्सद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत असून 114 खाजगी विहीर आणि बोअर अधिग्रहीत करण्यात आल्याचे सागितले. सातारा जिल्ह्यात वाई व खंडाळा तालुक्यसाठी दुष्काळ निधी शासनाकडून प्राप्त झाला असून यामध्ये वाई तालुक्यासाठी 22 कोटी 41 लाख तर खंडाळा तालुक्यासाठी 17 कोटी 82 लाख इतका निधी बाधित शेतकऱ्यांना निविष्ठा अनुदान देण्यासाठी वितरीत करण्यासाठी मान्यता प्राप्त झाली आहे. सदरचा निधी हा ई पंचनामा पोर्टलवर तहसलिदारांना उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे. जिल्ह्यात वाई व खंडाळा या तालुक्यात मध्यम स्वरुपाचा दुष्काळ जाहिर करण्यात आला असून त्यामध्ये वाई तालुक्यातील 7 आणि खंडाळा तालुक्यातील 4 महसूल मंडळांचा समावेश आहे. जिल्ह्यातील 89 महसूल मंडळांमध्ये दुष्काळ/ दुष्काळसदृश परिस्थिती घोषित करण्यात आली आहे. या महसूल मंडळांमध्ये शासन निर्णयानुसार सवलती लागु करण्यात आलेल्या आहेत. टंचाईग्रस्त गावांमध्ये जलजीवन मिशनची कामे पुर्ण करणे, विहीर खोलीकरण गाळ काढणे, नळपाणीपुरवठा योजनांची दुरुस्ती, रोजगार हमीतील कामे यासारख्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.

खरीप हंगाम 2024 दुष्काळ परिस्थितीच्या अनुषंगाने टंचाई परिस्थितीबाबत विविध उपाययोजना करण्यात आल्या आहेत. यामध्ये मुरघास लागवड उपक्रमास गती देण्यात येवून त्यासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेतून 3 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला आहे. ज्या भागांमध्ये प्रकल्पांचे पाणी पोहोचले आहे तेथील शेतकऱ्यांना ज्वारी आणि मका यांचे बियाणे उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. जिल्ह्यातील पशुधनासाठी ओला आणि सुका चाऱ्याचे जुलै 2024 पर्यंत नियोजन करण्यात आले आहे.

जिल्ह्यात बांबू लागवड अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येत असून 10 हजार हेक्टरवर बांबू लागवडीचे उद्दिष्ट हाती घेण्यात आले आहे. पावसाला सुरुवात होताच पुन्हा या मोहिमेला गती देण्यात येईल. असेही त्यांनी यावेळी सांगितले.

०००

माझी वसुंधरा अभियान 4.0 शहरी भागासह ग्रामीण भागात प्रभावीपणे राबवा – विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार

सातारा, दि. १५:  ग्रामीण भागातील गावे व शहरे स्वच्छ व सुंदर होण्यासाठी माझी वसुंधरा अभियान 4.0 प्रभावीपणे राबवावे. हे अभियान राबविताना जास्तीत जास्त नागरिकांसह शालेय विद्यार्थ्यांचा सहभाग घ्यावा, असे निर्देश पुणे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी दिले.

जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात माझी वसुंधरा अभियान 4.0 आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अपर जिल्हाधिकारी जीवन गलांडे, उपायुक्त नगर पालिका प्रशासन पुनम मेहता, टंचाई निवारण नोडल ऑफीसर निलीमा धायगुडे, नगर प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील, नगर परिषदांचे  मुख्याधिकारी व गट विकास अधिकारी उपस्थित होते.

माझी वसुंधरा अभियानाचा  लाभ शहरी व ग्रामीण भागात येणाऱ्या प्रत्येक नागरिकाला झाला पाहिजे, असे सांगून आयुक्त डॉ. पुलकुंडवार म्हणाले, नागरिकांना स्वच्छतेच्या सवयी लावणे आपल्या हातात आहे. गावे व शहरे स्वच्छ ठेवण्याबाबत जनजागृती करा. या अभियानात शहरी व ग्रामीण भागातील शाळेंच्या नोंदी कराव्यात. नोंदी झालेल्या शाळेतील विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवडीचा कार्यक्रम हाती घ्यावा.

ग्रामीण भागातील गायरान जागेवर ग्रामपंचायतीच्या सहकार्याने मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करावी. मागील वर्षी ज्या गावांनी व शहरांनी माझी वसुंधरा अभियानात नामांकन प्राप्त केले होते त्यांनी नामांकन टिकविण्यासाठी पूर्ण वर्षभर हे अभियान राबवावे. या पुढे बैठक न घेता माझी वसुंधरा अभियानात सहभागी गावांची व शहरांची प्रत्यक्ष पहाणी करणार असल्याचेही आयुक्त  डॉ. पुलकुंडवार यांनी सांगितले.

बैठकीच्या प्रारंभी शहरी व ग्रामीण भागात माझी वसुंधरा अभियान कशा प्रकारे राबविण्यात येणार आहे याची माहिती जिल्हाधिकारी श्री. डुडी यांनी दिली.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *