राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत आदर्श – सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे
लातूर, दि. 26 : लोककल्याणकारी लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज हे सामाजिक न्यायाचे मूर्तिमंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्य कर्तृत्वाची प्रेरणा पिढ्यान् पिढ्या ऊर्जा व सामाजिक जाणिव देत राहील, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनी केले आहे.
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या जयंतीनिमित्त आज श्री.मुंडे यांनी लातूर येथील सामाजिक न्याय भवन येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले आणि उपस्थितांना सामाजिक न्याय दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी लातूरचे समाज कल्याण प्रादेशिक उपायुक्त दिलीप राठोड, जात पडताळणी उपायुक्त अनिल शेंदारकर, सहाय्यक आयुक्त शिवकांत चिकुरते, जिल्हा समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, संशोधन अधिकारी सत्येंद्र औलवार यांसह समाज कल्याण विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
अभिवादनाच्या कार्यक्रमानंतर सामाजिक न्याय भवनाच्या आवारात श्री.मुंडे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.