मृत्यूनंतरचे अस्तित्व, आत्म्याचा पुनर्जन्म या गोष्टी मानल्या आहेत. त्या खोट्या कशा असतील?
मुंबई प्रतिनिधी चक्रधर मेश्राम. दि. ८ एप्रिल २०२१: —
धर्माला अंदाजे दोन-तीन हजार वर्षांचा इतिहास आहे. ज्या काळात मानवाने धर्म कल्पना निर्माण केल्या, त्या काळातील मानवी बुद्धीची समज अपूर्ण होती. निसर्गाचे व अफाट विश्वाचे ज्ञान केवळ कल्पनाविलासातून धर्ममार्तंडांनी निर्माण केले. सूक्ष्म निरीक्षण, अनुभव, तर्क, प्रयोग यांच्या काटेकोर निकषांवर धर्मकल्पना निर्माण झाल्या नाहीत. बायबलमधील विश्वरचनेची कल्पना कशी आहे? पृथ्वी विश्वाचा केंद्रबिंदू आहे. सूर्य, चंद्र व इतर तारे पृथ्वी भोवती फिरतात. पृथ्वी स्थिर आहे. आकाशातील सूर्य, चंद्रादी गोल गुळगुळीत आहेत. त्यांची संख्या कायम आहे. गॅलीलिओने दुर्बिणीचा वापर केल्यानंतर सूर्यावरचे डाग दिसू लागले. चंद्र खडबडीत आहे हे समजले.
गुरूभोवती उपग्रह असल्याचे दिसून आले. शुक्राला कला होतात हे ध्यानात आले. धर्मग्रंथात वर्णन केलेल्या आकाशातील या गोलांची वर्णने दुर्बिणीमुळे असत्य असल्याचे आपल्याला समजले, आज पृथ्वी सूर्याभोवती फिरते हे सत्य आपण स्वीकारले आहे. भूतकाळातील बुद्धीच्या व निरीक्षण साधनांच्या मर्यादा यांमुळे विविध धर्मांतील कल्पना या असत्य असल्याचे आज आपण निश्चयपूर्वक सांगू शकतो. याच आधारे मृत्यूनंतरचे अस्तित्व व आत्म्याचा पुनर्जन्म या कल्पना असत्य आहेत, असे आज ज्ञानाच्या आधारे आपण सांगू शकतो.पुनर्जन्म व मृत्यूनंतरचे आत्म्याचे अस्तित्व या गोष्टी सत्य नसल्यानेच विविध धर्मांतील या बद्दलच्या कल्पना एकाच नाहीत. हिंदू लोक पुनर्जन्म व ८४ लक्ष योनींतून जीवन फिरते असे मानतात. मुस्लिम व ख्रिश्चन लोक तसा पुनर्जन्म मानत नाहीत. मुस्लिम धर्माप्रमाणे मृत व्यक्तीचा कयामतच्या वेळी न्यायनिवाडा होतो. ख्रिश्चनांच्यात The day of judgement चे वेळी आत्म्याचे काय होणार हे ठरते. विविध धर्मांतील या भिन्न कल्पना लक्षात घेतल्या तर आत्मा हे वस्तुनिष्ठ सत्य नाही, तर केवळ कल्पना विलास आहे हे लक्षात येते. विज्ञानपूर्व काळात, माणूस मेल्याचे दुःख व त्यातून मरणोत्तर अस्तित्वाबद्दल केलेला कल्पनाविलास त्या काळातील बुद्धीमर्यादेनुसार सहज शक्य होता. पण आजच्या शास्त्रीय निकषांवर हा कल्पना विलास टिकत नाही
(डॉ. नरेंद्र दाभोलकर व प्रा. प. रा. आर्डे यांनी लिहिलेल्या ‘अंधश्रद्धा: प्रश्नचिन्ह आणि पूर्णविराम’ या पुस्तकातून साभार)