महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

महिला आणि बालकांच्या सुरक्षेसाठी स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीसांनी समन्वयाने धोरण आखावे – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

Summary

मुंबई, दि. 7 : महिलांची आणि बेपत्ता बालकांची सुरक्षितता हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असून सार्वजनिक तसेच निर्जन स्थळी होणाऱ्या महिला अत्याचार, चोरी आणि हल्ले अशा घटनांना आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस […]

मुंबई, दि. 7 : महिलांची आणि बेपत्ता बालकांची सुरक्षितता हा प्रश्न अत्यंत महत्त्वपूर्ण असून सार्वजनिक तसेच निर्जन स्थळी होणाऱ्या महिला अत्याचार, चोरी आणि हल्ले अशा घटनांना आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा आणि मनुष्यबळाचा वापर करणे आवश्यक आहे. प्रशासन आणि पोलीस यांनी समन्वय साधून महिला सुरक्षा धोरण आखावे, असे निर्देश विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दिले.

कल्याण, जि.ठाणे येथील मुकबधिर मुलीवर तसेच कोळसेवाडी येथे मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेबाबत व फटका गँगच्या चोरीच्या घटनांसंदर्भात,  महिलांवर सार्वजनिक ठिकाणी होणारे हल्ले, बालकांचे बेपत्ता होण्याचे प्रमाण यावर निर्बंध घालण्यासाठीच्या उपायोजनांबाबत विधानभवनात बैठकीचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी महिला आणि बालकांच्या सुरक्षिततेबाबत कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या.

या बैठकीस रेल्वेचे महानिरीक्षक कैसर खलीद, रेल्वे सुरक्षा दलाचे वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त श्री श्रीवास्तव, अपर पोलीस आयुक्त दत्तात्रय कराळे, पोलीस निरीक्षक संभाजी जाधव, पोलीस उपनिरीक्षक मंजुषा शेलार आदीसह अधिकारी उपस्थित होते.

उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे म्हणाल्या, ताळेबंदीवर शिथिलता आल्यावर सार्वजनिक ठिकाणी तसेच रेल्वे परिसरातील निर्जन स्थळी महिलांवर अत्याचार, चोरी आणि हल्ले होण्याच्या घटना अलिकडच्या काळात घडल्या आहेत. तसेच, रेल्वेतून काही बालके पळून जाणे अथवा त्यांची तस्करी होऊन त्यांच्यासोबत अत्याचाराच्या घटना घडण्याची शक्यता असल्याने या घटनांना आळा बसावा यासाठी स्थानिक पोलीस आणि रेल्वे पोलीस यांनी समन्वय साधून सुरक्षेसाठी धोरण ठरवावे, असे निर्देश उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.

निर्जन स्थळी सुरक्षेसाठी मनुष्यबळ आणि सीसीटीव्ही कॅमेराचा वापर करण्यात यावा. ज्या वास्तु वापरात नाही किंवा त्या वास्तु धोकादायक अवस्थेत आहेत त्या पूर्णत: बंद कराव्यात अथवा पाडून टाकण्यासाठीच्या प्रक्रिया करण्यात याव्यात. रेल्वेतील प्रवाशांना फटका मारून मोबाईल चोरण्याच्या घटनाही वाढल्या आहेत. याबाबत कडक कारवाई करण्यात यावी असेही डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी सांगितले.

कोविड पार्श्वभूमीवर असलेल्या टाळेबंदीच्या काळात कुटुंबियांकडून महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढल्या आहेत. ताळेबंदीमुळे महिला तक्रार निवारण समिती आणि महिला दक्षता समिती यांच्यात दृकश्राव्य पद्धतीने संवाद होणे गरजेचे आहे. तसेच, तक्रारदार महिलांशीही दृकश्राव्य पद्धतीने संवाद साधून त्यांचे समुपदेशन करावे. पुणे येथे महिलांच्या सुरक्षेसाठी नोकरदार महिलांचे व्हॉट्सॲप ग्रुप तयार करण्यात आले होते. याच धर्तीवर मुंबई, ठाणे शहरी आणि ग्रामीण येथेही प्रायोगिक तत्त्वावर ग्रुप तयार करण्यात यावेत.

याचबरोबर रेल्वे प्रशासनाने गुन्ह्याच्या हेतुने सुरक्षेला बाधा आल्यास प्रवाशांना नुकसान भरपाई अथवा विमा देण्यासंदर्भात धोरण तयार करण्यासाठीचे प्रयत्न करावेत. महिलांच्या सुरक्षेसाठी होमगार्ड कार्यरत असावेत यासाठीच्या कार्यवाहीस गती द्यावी, अशा सूचनाही उपसभापती डॉ.गोऱ्हे यांनी यावेळी दिल्या.

उपस्थित अधिकारी यांनी रेल्वे पोलीस आणि पेालीस यांच्या समन्वयाने महिलांवरील हल्ले आणि निर्जन स्थळी होणाऱ्या अत्याचारासंदर्भात कारवाई करण्यासंदर्भात सकारात्मकता दर्शवली आहे. रेल्वे स्टेशन परिसरातील धोकादायक इमारतींचे पाडकाम करण्यात येणार असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली. आतापर्यंत घडलेल्या गुन्ह्यातील आरोपीचा सीसीटीव्ही कॅमेराच्या सहाय्‍याने मागोवा घेण्यात आला असून, ९५ टक्के आरोपींना अटक करण्याचे प्रमाण असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी यावेळी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *