मध्यप्रदेश सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी ४ हजार रुपये जमा करणार
भोपाळ : पोटनिवडणुकीपूर्वी मध्य प्रदेशातील शिवराज सिंह चौहान सरकारने मोठी घोषणा केली आहे. आता मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांच्या खात्यात दरवर्षी वेगळे ४ हजार रुपये सरकार जमा करेल. शेतकऱ्यांना सध्या केंद्र सरकारच्या ‘किसान सन्मान निधी’ अंतर्गत दरवर्षी 6 हजार रुपये देण्यात येत आहेत. आता मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना या व्यतिरिक्त आणखी ४ हजार रुपये मिळणार आहेत. म्हणजेच मध्य प्रदेशातील शेतकऱ्यांना दरवर्षी एकूण १० हजार हजार रुपये मिळतील.
शेतकऱ्यांसाठी पहिल्या टप्प्यात ‘मुख्यमंत्री शेतकरी कल्याण योजना’ टप्प्यात सुरू केली जात आहे, असं मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी जाहीर केलं. या योजनेंतर्गत पीएम सन्मान निधीच्या सर्व पात्र लाभार्थी शेतकरी कुटुंबांना आर्थिक वर्षात २ हप्त्यांमध्ये एकूण ४ हजार रुपये देण्यात येतील. शेतकर्यांचे कल्याण हेच आपल्या जीवनाचे ध्येय आहे, असं चौहान म्हणाले.
आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी कटिबद्ध आहोत. आम्ही शून्य व्याजदरावरील कर्ज योजना पुन्हा सुरू केली आहे. किसान सन्मान निधी आणि विमा योजनेचा पूर्ण लाभ दिला आहे. धान्य खरेदीतून २७ हजार कोटींपेक्षा जास्त निधीचा लाभ शेतकऱ्यांना पोहोचवला आहे. २०२२ पर्यंत शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या वचनपूर्तीत कुठलीही कसर ठेवणार नाही, असं शिवराजसिंह म्हणाले.
शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने त्यांच्या हिताच्या योजना राबवल्या जातील, असा निर्णय सरकारने घेतला आहे. आरसीबी (४) अंतर्गत सवलत, पीएम किसान निधी, शून्य टक्के व्याजावर कर्ज देणं, पंतप्रधान पीक विमा अशा सर्व योजना एकत्र करून शेतकऱ्यांना एक पॅकेज स्वरूपात लागू केल्या जातील.