BREAKING NEWS:
नागपुर महाराष्ट्र हेडलाइन

‘भारतीय विद्या भवन’ ने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी केला : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Summary

नागपूर दि. 22 : दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया, सोबतच उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळाच्यामार्फत केवळ शिक्षण नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उच्च मानके निर्माण करणाऱ्या भारतीय विद्या भवन संस्थेने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी करण्याची शिकवण दिली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री […]

नागपूर दि. 22 : दर्जेदार शिक्षण आणि गुणवत्तेवर आधारित प्रवेश प्रक्रिया, सोबतच उत्तम प्रशिक्षित मनुष्यबळाच्यामार्फत केवळ शिक्षण नव्हे तर कला, क्रीडा, सांस्कृतिक क्षेत्रात उच्च मानके निर्माण करणाऱ्या भारतीय विद्या भवन संस्थेने ज्ञानाचा उपयोग समाज निर्मितीसाठी करण्याची शिकवण दिली, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज येथे केले.

भगवानदास पुरोहित, भवन्स विद्या मंदिर चिंचभुवन शाखेच्या उद्घाटन सोहळ्यात प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी या संस्थेचे विश्वस्त पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित होते. व्यासपीठावर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा आमदार चंद्रशेखर बावनकुळे, माजी खासदार अजय संचेती, विजय दर्डा, भवनचे पदाधिकारी राजेंद्र पुरोहित, राकेश पुरोहित, डॉ पंकज चहांदे, जिमी राणा, डॉ. विनय नानगीया, विजय फणसीकर, के.एम.अग्रवाल, क्यू.एच.जीवाजी, टि.एल.राजा, विजय ठाकरे, स्वप्नील गिरडकर यासह संस्थेच्या विविध शाखांच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.

या एका संस्थेच्या चार शाळांचे भूमिपूजन व त्याच चार शाळांचे उद्घाटन करण्याची संधी मला माझ्या राजकीय जीवनात मिळाली. बनवारीलाल पुरोहित यांच्या मार्गदर्शनात प्रत्येक शाळा अत्याधुनिक बनविण्याचे काम सुरु आहे. त्यांनी कधीही शिक्षणाचा बाजार मांडला नाही. इंजिनिअरिंग कॉलेज असो की शाळा, डोनेशन घेतले नाही. नुकसान व फायदा याचा विचार न करता उत्तमात उत्तम शिक्षण देण्याचे त्यांनी लक्ष ठेवले. म्हणूनच ते या संस्थांमध्ये गुणवत्ता राखू शकले, ‘राईट टू एज्युकेशन’ या नियमानुसार मुलांना 25% जागांवर शंभर टक्के नियमाने प्रवेश देणारी भवन्स ही प्रमुख शाळा आहे. केवळ शिक्षणच नव्हे तर कला, क्रीडा, संस्कृती या क्षेत्रातही वेगळे मापदंड या शाळेने निर्माण केले असे गौरवोद्गार त्यांनी यावेळी काढले.

पंजाबचे राज्यपाल बनवारीलाल पुरोहित यांनी अध्यक्षीय भाषण केले. 1938 पासून सुरू झालेल्या या संस्थेने जगभरात आपले जाळे विणले आहे. भारतासह आणखी सहा देशांमध्ये भारतीय विद्या भवनच्या शाखा आहेत. देशात 350 ठिकाणी ही संस्था असून एकूण दोन लक्ष 25 हजार विद्यार्थ्यांना विद्यादानाचे काम या संस्थेमार्फत सुरू आहे, असे त्यांनी सांगितले.

शैक्षणिक संस्थांसाठी असणारे विविध पुरस्कार या संस्थेला प्राप्त असून एकट्या नागपुरात 17 हजार विद्यार्थी भवनच्या वेगवेगळ्या शाळांमध्ये शिक्षण घेत आहेत. या शाळेचा कारभार पारदर्शी ठेवण्याचा आपला प्रयत्न असून गुणवत्तेसोबत तडजोड नाही, हे धोरण कायम आहे. नागपूरमध्ये एक भव्य भारतीय संस्कृती केंद्र आकाराला येत असून मध्य भारतातील ते आकर्षण असेल. भारतीय विद्या भवन हे कार्य कामठी परिसरात उभारत असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्याध्यापिका राजी श्रीनिवासन यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *