भंडारा पोलिसांचा ‘रुद्रावतार’! एसपी नूरुल हसन यांच्या आदेशाने अवैध धंद्यांवर सर्जिकल स्ट्राईक
अड्याळ, आंधळगाव अन् गोबरवाहीत एकाच वेळी छापेमारी; २.२१ लाखांचा मुद्देमाल जप्त!
भंडारा (प्रतिनिधी):
जिल्ह्यातील अवैध धंदे आणि माफियांना आता पळता भुई थोडी झाली आहे. पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन यांनी अवैध व्यवसायांचे कंबरडे मोडण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतर, भंडारा पोलिसांनी जिल्ह्याच्या विविध भागात ‘सिनेस्टाईल’ धाडी टाकत गुन्हेगारांना मोठा दणका दिला आहे. मागील २४ तासांत केलेल्या या धडक कारवाईत पोलिसांनी २,२१,८५५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, या कारवाईमुळे अवैध व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.
🔥 अड्याळमध्ये ‘मोहाफास’चा डोंगर जप्त!
या संपूर्ण मोहिमेत अड्याळ पोलिसांनी सर्वात मोठी कामगिरी केली. चिखली परिसरात धाड टाकून पोलिसांनी करण बिलवणे (२२) याच्याकडून तब्बल ८०० किलो सडवा मोहाफास आणि दारू गाळण्याचे साहित्य जप्त केले. या एकाच कारवाईत १,६४,१०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच, पहेला परिसरात साहेबलाल गजबे याला सट्टा चालवताना रंगेहात पकडून जुगाराचा डाव उधळून लावला.
⚡ आंधळगाव अन् गोबरवाहीत ‘मोहा’वर घाला
आंधळगाव: आंबागड शिवारात पोलिसांनी छापा मारून अनंतराम डोनेकर (३८) याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून २७० किलो सडवा मोहाफास (किंमत ५४,००० रुपये) जप्त करण्यात आला.
गोबरवाही: रोघा परिसरात एका ५० वर्षीय महिलेवर कारवाई करत ५ लिटर हातभट्टीची दारू जप्त करण्यात आली.
🚨 भंडारा शहरातही पोलिसांचा ‘पंजा’
भंडारा शहर पोलिसांनी गौतम बुद्ध वॉर्ड (मेंढा) येथे धाड टाकून एका महिला आरोपीकडून हातभट्टीची दारू जप्त केली. पोलिसांनी अवैध साठ्यावर झडप घालत सर्व साहित्य पोलीस कोठडीत जमा केले आहे.
खाकीची दहशत: जिल्हयात आता फक्त कायद्याचे राज्य!
पोलीस अधीक्षक श्री. नूरुल हसन आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. निलेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हयातील सर्व ठाणेदारांनी ही मोहीम राबवली आहे. दारू अड्ड्यांवर २,२०,७०० रुपये तर जुगार अड्ड्यावर १,१५५ रुपयांची ही मोठी कारवाई म्हणजे अवैध धंदेवाल्यांसाठी धोक्याची घंटा मानली जात आहे.
”अवैध व्यवसायांच्या मुळावर घाव घालण्याची प्रक्रिया सुरू झाली असून, यापुढेही अशीच कठोर कारवाई सुरू राहील,” असा इशारा पोलीस प्रशासनाने दिला आहे.
वृत्तसंकलन:
अमर वासनिक
न्यूज एडिटर, पोलीस योद्धा न्यूज नेटवर्क
