पूरपरिस्थितीमुळे बाधित नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा – पालकमंत्री सतेज पाटील यांचे निर्देश
Summary
कोल्हापूर,दि.23 (जिल्हा माहिती कार्यालय): सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना देवून प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील ग्रामस्थांचे शंभर टक्के स्थलांतर करून जलदगतीने मदतकार्य सुरू करा, […]
कोल्हापूर,दि.23 (जिल्हा माहिती कार्यालय): सध्याच्या अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे बाधित होणाऱ्या भागातील नागरिकांचे आणि जनावरांचे तात्काळ सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करा, अशा सूचना देवून प्रयाग चिखली, आंबेवाडी, आरे यासह पुराचा सर्वाधिक धोका असणाऱ्या गावातील ग्रामस्थांचे शंभर टक्के स्थलांतर करून जलदगतीने मदतकार्य सुरू करा, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्हा प्रशासनाला केल्या.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील पूरपरिस्थितीमध्ये मदतकार्य पोहचण्याच्या दृष्टीने रात्री उशिरापर्यंत प्रशासकीय यंत्रणेसोबत बैठक घेऊन आवश्यक त्या सूचना केल्या. बैठकीला आमदार ऋतुराज पाटील, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, महापालिका आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण, पाटबंधारे विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे, महावितरणचे अंकुर कावळे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
पालकमंत्री सतेज पाटील यांनी जिल्ह्यातील विविध भागांतील पावसाचा आणि पूरपरिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी त्यांनी पंचगंगा नदीची पाणी पातळी सतत वाढत आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी ४३ फुटांवर गेल्यानंतर कोल्हापूर-रत्नागिरी रस्ता बंद होतो. त्यामुळे प्रयाग चिखली, आंबेवाडी आणि आरे गावातील पूरग्रस्त नागरिकांचे १०० टक्के स्थलांतर करावे, अशी सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली. जिल्ह्यातील पुरबाधित नागरिकांचे आणि जनावरांचे स्थलांतरण करून त्यांना युद्धपातळीवर मदत पोहचवावी. स्थलांतरित केलेल्या नागरिकांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करावी. यात अन्नधान्य, औषध पुरवठा, वैद्यकीय सेवा सुविधा पुरवाव्यात. तसेच जनावरांनाही आवश्यक चारा, पाणी आणि पशुखाद्य पुरवावे, अशा सूचना देऊन पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले, पूरग्रस्त भागात अधिकाऱ्यांनी व्यक्तिशः जाऊन मदत करावी. अतिवृष्टीमुळे खंडित झालेला दूरध्वनी आणि विद्युत पुरवठा तात्काळ सुरू करावा.
पूर परिस्थितीमुळे चंदगड, गडहिंग्लज, आजरा मार्ग बंद झाले आहेत. कर्नाटक मार्गावरुन चंदगड, आजरा, गडहिंग्लज भागात येणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील नागरिकांना आरटीपीसीआर तपासणी बंधनकारक करु नये, अशा सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी बेळगावचे जिल्हा पोलीस अधीक्षक यांना दूरध्वनीवरून केल्या. जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांपर्यंत गतीने मदतकार्य पोहोचवण्याच्या दृष्टीने प्रसंगी हेलिकॉप्टर ची मदत घेण्यात येईल, असे सांगून यासाठी हेलिपॅड ची व्यवस्था करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांच्याकडून घेतली.
त्याचबरोबर कोल्हापूर शहरातील बापट कॅम्प, शाहूपुरी, रामानंदनगरसह पुरबाधित भागातील नागरिकांचे सुरक्षित ठिकाणी स्थलांरीत करण्याचा सूचना त्यांनी आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिल्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी प्रशासनातर्फे पूरपरिस्थितीत नागरिकांसाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनाबाबत माहिती दिली. या बैठकीला प्रशासनातील विविध विभागांचे प्रमुख उपस्थित होते.