पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते दोन ऑक्सिजन प्लांटचे लोकार्पण
महिला व बाल रुग्णालय परिसरात उभारणी
जिल्हा वार्षिक योजनेतून निधीची उपलब्धता
वाशिम, दि. १९ (जिमाका) : जिल्हा वार्षिक योजनेतून कोविड-१९ उपाययोजनासाठी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून महिला व बाल रुग्णालय परिसरात दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. या दोन्ही प्लांटचे लोकार्पण पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते आज, १९ जुलै रोजी करण्यात आले.
यावेळी खासदार भावना गवळी, आमदार गोपीकिशन बाजोरिया, आमदार किरणराव सरनाईक, जिल्हाधिकारी षण्मुगराजन एस., जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, सहायक जिल्हाधिकारी कुलदीप जंगम, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश आहेर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कोरोना संसर्गाच्या संभाव्य तिसरी लाटेचा धोका लक्षात घेवून महिला व बाल रुग्णालय परिसरात नवीन दोन ऑक्सिजन प्लांटची उभारणी करण्यात आली आहे. प्रत्येक प्लांट प्रति मिनिटाला ६०० लिटर ऑक्सिजन निर्मिती करेल. यापूर्वी केंद्र शासनाच्या निधीतून महिला व बाल रुग्णालय परिसरात प्रति मिनिट २०० लिटर ऑक्सिजन निर्मिती क्षमतेचा प्लांट कार्यान्वित करण्यात आला आहे. नवीन दोन ऑक्सिजन प्लांट कार्यान्वित झाल्याने ऑक्सिजनच्या बाबतीत जिल्हा स्वयंपूर्ण होण्यास मदत होईल, असे पालकमंत्री श्री. देसाई यावेळी म्हणाले.
पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह उपस्थित मान्यवरांच्या हस्ते यावेळी महिला व बाल रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करण्यात आले.