BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

नितीमुल्यांचे पालन केल्यास सेवेसाठी ऊर्जा मिळते – राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

Summary

वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य सन्मान प्रदान मुंबई, दि. 28 : कोरोना असो वा नसो, डॉक्टरांकरिता प्रत्येक दिवस आव्हानात्मक व तणावाचा असतो. मात्र ताणतणाव दूर करण्यासाठी योग व ध्यान केल्यास तसेच कार्य करताना नीतिमुल्यांचे पालन केल्यास सेवा करण्याची वेगळीच शक्ती व ऊर्जा […]

वैद्यकीय क्षेत्रातील आरोग्य सन्मान प्रदान

मुंबई, दि. 28 : कोरोना असो वा नसो, डॉक्टरांकरिता प्रत्येक दिवस आव्हानात्मक व तणावाचा असतो. मात्र ताणतणाव दूर करण्यासाठी योग व ध्यान केल्यास तसेच कार्य करताना नीतिमुल्यांचे पालन केल्यास सेवा करण्याची वेगळीच शक्ती व ऊर्जा प्राप्त होते, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.

वैद्यकीय क्षेत्र व शिक्षणात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या राज्यातील निवडक डॉक्टरांना राज्यपालांच्या हस्ते बुधवारी (दि. २८) राज्यस्तरीय आरोग्य  सन्मान राजभवन येथे प्रदान करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. आरोग्य सन्मान सोहळ्याचे आयोजन डॉक्टर्स डिरेक्टरी इंडिया (डीडीआय) व क्लाउड फाउंडेशन या संस्थेने केले होते.

क्लाउड फाऊन्डेशनचे अध्यक्ष डॉ गिरीश कामत, उपाध्यक्ष डॉ. देवेंद्र हम्बर्डीकर व मुख्य संयोजक डॉ. मनोज देशपांडे यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.

भारताला वैद्यकीय क्षेत्रातील तज्‍ज्ञांची थोर परंपरा लाभली असून देशातील जुने अनुभवसिद्ध वैद्यकीय ज्ञान पारखून नव्याने पुढे आणले पाहिजे असे राज्यपालांनी सांगितले. महाराष्ट्राने देशाला अनेक क्षेत्रात नेतृत्व दिले आहे, असे सांगून राज्याने वैद्यकीय क्षेत्रात आणखी आदर्श प्रस्थापित करावे असे राज्यपालांनी सांगितले.

राज्यपालांच्या हस्ते डॉ डी. जे आरवाडे, वैद्य गोपालकृष्ण अंदनकर, डॉ.राजाराम जगताप व डॉ. राजीव बोरले यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले, तर डॉ.अजित दामले यांना हिप्पोक्रेटस पुरस्कार देण्यात आला.

वैद्य विनय वेलणकर (धन्वंतरी पुरस्कार), डॉ अरुण जाधव (सम्युएल हानमेन पुरस्कार) डॉ.आशिष नवरे (डॉ रफिउद्दिन अहमद पुरस्कार), श्रीमती इंदुमती थोरात (फ्लोरेंस नाईटीन्गेल पुरस्कार), बालरोग तज्ञ डॉ यशवंत आमडेकर (विशेषज्ञ पुरस्कार) व पुण्याचे पोलीस सहआयुक्त डॉ रवींद्र शिसवे (पोलीस सेवेतील डॉक्टर) यांना देखील आरोग्य सन्मान प्रदान करण्यात आले.

राज्यपालांचे हस्ते पुरस्कार निवड समितीच्या सदस्यांचा देखील सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्र संचलन डॉ.आशुतोष गुप्ता यांनी केले तर आभार प्रदर्शन डॉ. संजय कदम यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *