महाराष्ट्र हेडलाइन

धर्माचे धोकादायक राज्य.? धार्मिक उन्मादाला रोखण्याची ताकद लोकशाही तत्वज्ञान आणि लोकशक्तीमध्येच आहे. – डॉ. विश्वंभर चौधरी यांनी व्यक्त केले विचार.

Summary

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021 गांधी होण्याला खूप कष्ट पडतात; मात्र एक पिस्तुल हातात आले की, नथुराम होता येते. असे खूप नथुराम तयार झाले, की ते धर्माचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करतात. अफगाणिस्तानात ते प्रयत्न यशस्वी होऊन […]

मुंबई विभागीय प्रतिनिधी चक्रधर मेश्राम दि. 8 मे. 2021
गांधी होण्याला खूप कष्ट पडतात; मात्र एक पिस्तुल हातात आले की, नथुराम होता येते. असे खूप नथुराम तयार झाले, की ते धर्माचं राज्य आणण्यासाठी प्रयत्न करतात.
अफगाणिस्तानात ते प्रयत्न यशस्वी होऊन पिढ्याच्या पिढ्या नाही, तर देश बरबाद झाला. भारतात ती प्रक्रिया काही विशिष्ट विचारधारांनी सुरू केली आहे.
भारतीय समाज निष्क्रिय असल्यानं अजूनपर्यंत त्या विरोधात फारसा आवाज उठताना दिसत नाही. समाज आवाज उठवेल, तेव्हा कदाचित वेळ निघून गेलेली असेल. आज इस्लामी दहशतवादाला उत्तर या नावानं उभ्या राहिलेल्या हिंदुत्ववादी दहशतवाद्यांकडे कानाडोळा करणं समाजाला महागात पडेल. बंदुका रोखायला एकदा परवानगी दिली की, बंदुकीचे तोंड कोणाकडे असावे, हे ज्याच्या हातात बंदूक असेल तो ठरवेल. इस्लामी जगाची स्वप्ने पाहात अफगाणी जनतेने तालिबानला पसरू दिले आणि क्रमाने नंतर तालिबान्यांनी बंदुका अफगाणिस्तानातील इस्लामी जनतेवरच रोखल्या. बायकांना बुरखे सक्तीचे केले, बुद्ध मूर्ती फोडल्या. समाज जागा झाला, तोपर्यंत तालिबानी हे देशाचे सत्ताधीश झाले होते. यापासून आपण बोध घ्यायला हवा.
कोणत्याही धर्माचा असो, धार्मिक उन्माद चालवून घेता कामा नये. धर्म आपापल्या घरी किंवा मंदिर, मशीद, चर्चमध्ये; रस्त्यावर फक्त आणि फक्त राज्यघटनेचं राज्य असेल, हे सर्वच धर्मांना ठणकावून सांगायची वेळ आलेली आहे. नुकताच न्यायालयानं मशिदीवरील भोंग्यांना ध्वनिप्रदूषण कायदा लागू होतो, हे ठणकावून सांगितलं, न्यायालयाचं त्यासाठी अभिनंदन केलं पाहिजे.
धार्मिक गुन्हेगार मुस्लिम असोत की हिंदू, आमच्या धर्माच्या भावना दुखावल्या गेल्या, हे कारण ते पुढे करतात. जणू काही संपूर्ण समाजाने भावनाविषयक आपले सर्व अधिकार बहाल केले असून समाजाचे धार्मिक नेतृत्व यांना देऊनच टाकले आहे! सिमी, एमआयएम यांच्यासारख्या संघटनांना मुस्लिम समाजातील मूठभरांचा पाठिंबा असतो (अन्यथा मुस्लिम लीग खूप मोठा पक्ष झाल्याचे दिसले असते!) आणि बजरंग दल, श्रीराम सेना यांनाही मूठभर हिंदूंचाच पाठिंबा असतो, पण दोन्हीकडचे मूठभर दोन्हीकडच्या संपूर्ण समाजाचा कब्जा करून आपले तथाकथित धार्मिक व्यवहार संपूर्ण समाजावर लादू पाहतात. यांच्यासाठी देशापेक्षा धर्म मोठा असतो आणि हिंसा हा धार्मिक दहशतीचा मार्ग असतो. दोन्ही धर्मातील लोकांच्या दैनंदिन प्रश्नावर मात्र यांच्या भावना दुखावत नाहीत. शेतकरी आत्महत्या करतात आणि त्यातील ऐंशी टक्के शेतकरी हे हिंदू असतात; तेव्हा त्यांच्या आत्महत्यां मुळे यांच्या भावना दुखावल्याचे कधी ऐकिवात नाही.
भारतातील महिला पाण्यासाठी सरासरी अडीच किलोमीटर चालते, आणि त्यात ऐंशी टक्के हिंदू स्त्रियादेखील ही पायपीट करतात, यावर कधी त्यांच्या भावना दुखावत नाहीत.देशात आज ‘सेक्युलर’ हा शब्द शिवीसारखा वापरणे हा एका ‘सांस्कृतिक संघटनेचा’ रोजचा अजेंडा झालेला आहे. मात्र वास्तव हे आहे की, हिंदूंमधील निम्मी लोकसंख्या असलेल्या स्त्रियांना जेव्हा सती म्हणून सक्तीने जाळले जात होते, तेव्हा सतीची चाल बंद करण्यासाठी राजा राममोहन रॉय यांच्यासारखा सेक्युलर माणूसच जन्मावा लागला! हिंदूहित रक्षक म्हणून त्या वेळी अस्तित्वात असलेल्या कोणत्याही तथाकथित सांस्कृतिक संघटनेनं बायकांना सती जाण्यापासून परावृत्त केलं नाही, उलट धर्माचार म्हणून सती जायला प्रोत्साहित केलं!
जगभरातील धर्मवादी संघटनांनी धर्माला विकृत करून लोकांच्या मनात धर्माची भीतिदायक प्रतिमा उभी केलेली आहे. मध्ययुगात माध्यमं नव्हती, शिक्षण नव्हते म्हणून हे चालून गेले. आताच्या युगात शास्त्रीय माहिती सहज उपलब्ध असल्यानं लोक चिकित्सा करतात आणि मग मुळात धर्मालाच नाकारतात!
भारताच्या जनगणनेच्या नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीत तब्बल २९ लाख लोकांनी आपला धर्म ‘निधर्मी’ असल्याची नोंद केली. ही सुरुवात आहे. यापुढे धार्मिक उन्माद वाढवणाऱ्या सर्व शक्तींविरोधात लोकांमध्ये जावे लागेल, आणि लोकांना काय चालले आहे, यावर जागे करावे लागेल. हा लढा सुरुवातीला या धर्मातील कट्टर विरुद्ध त्या धर्मातील कट्टर, असा असल्याचे भासत असले तरी अंतत: हा लढा सर्व धर्मातील कट्टर विरुद्ध निष्पाप सामान्य जनता असाच असतो. धार्मिक उन्मादाला नेस्तनाबूत करण्याची ताकद लोकशक्तीमध्येच आहे. त्या शक्तीला सर्व थरातून जागं करण्याची वेळ आता आलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *