पुणे महाराष्ट्र हेडलाइन

देशातील सर्व समुदायाच्या गरजा जाणून त्यांच्यासाठी सहाय्यकारी सॉफ्टवेअर, उत्पादने बनवावीत – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

Summary

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न पुणे, दि. ३: देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय […]

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. ३: देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला सहाय्यकारी होऊ शकतील अशी सॉफ्टवेअर, आरोग्यसेवा उत्पादने आणि बाजारपेठीय धोरणे बनवावीत, असा संदेश राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी विद्यार्थ्यांना दिला.

सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ लवळे येथे आयोजित २१ व्या पदवीप्रदान समारंभात राष्ट्रपती बोलत होत्या. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, विद्यापीठाचे कुलपती डॉ. शां. ब. मुजूमदार, कुलगुरु डॉ. रामकृष्णन रमण, प्र. कुलगुरु विद्या येरवडेकर आदी उपस्थित होते.

पदवीप्रदान सोहळ्यात पदवी प्राप्त विद्यार्थ्यांचे अभिनंदन करुन राष्ट्रपती श्रीमती मुर्मू म्हणाल्या, आज मुले आणि मुली प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. नारी शक्तीचा विकास हा देशवासियांसाठी अभिमानाचा विषय आहे, शिवाय देशाच्या विकासाचाही तो एक महत्त्वाचा मापदंड आहे. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठात लिंग समानतेला प्राधान्य दिले जाते ही बाब प्रशंसनीय आहे. पदवीप्रदान सोहळ्यात सुवर्णपदक प्राप्त ११ विद्यार्थ्यांपैकी ८ मुली असल्यावरून मुलींच्या शिक्षणासाठीही येथे योग्य वातावरण आणि सुविधा दिल्या जातात, असे दिसून येते. मुलींना उच्च शिक्षण घेण्यास प्रोत्साहित करण्यासह त्यांच्यासाठी सुरक्षित आणि आश्वासक वातावरण निर्माण करण्यासाठी कार्यक्रम राबवण्याचे आवाहन राष्ट्रपतींनी शैक्षणिक संस्थांना केले.

जगातील अनेक भागातून या संस्थेत उच्च शिक्षणासाठी विद्यार्थी येतात. भविष्यातील आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तयार होण्यासह देश-विदेशात आणि विविध क्षेत्रात प्रभावी योगदान देण्यासाठी एक मजबूत संपर्क जाळे (नेटवर्क) देखील बनवतात. भविष्यात विदेशातील विद्यार्थी आपल्या देशात गेल्यावरही या संस्थेशी नाते कायम ठेवतील तसेच आपल्या आधुनिक ज्ञान आणि कौशल्यांचा उपयोग मानवतेच्या कल्याणासाठी करतील, असा विश्वासही राष्ट्रपतींनी व्यक्त केला.

श्रीमती मुर्मू पुढे म्हणाल्या, तुम्ही विद्यार्थी आपल्या व्यक्तिमत्वाने आणि ज्ञानाने देश-विदेशातील मोठ्या संस्था आणि इतर लोकांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणू शकता. नवकल्पना आणि कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगद्वारे व्यवस्थापन, आरोग्यसेवा, विधी, सामाजिक विज्ञान आणि अन्य क्षेत्रात प्रभावी योगदान देऊ शकता. मेक इन इंडिया, स्टार्टअप इंडिया, स्किल इंडिया, डिजिटल इंडिया याद्वारे आपली ध्येये साध्य करण्यासाठी मदत होईल. केवळ आपल्या उपजीविकेचा आणि कुटुंबाचा विचार न करता ‘वसुधैव कुटुंबकम’ या अर्थाने संपूर्ण जगाचा विचार करावा, असा संदेश राष्ट्रपतींना विद्यार्थ्यांना दिला.

राष्ट्रपती पुढे म्हणाल्या, शिक्षण व्यवस्थेत संशोधनाला चालना देण्याची आवश्यकता आहे. अनेक वर्षांच्या संशोधनामुळे नवीन शोध, आणि आव्हानांना तोंड देण्यासाठी नवीन उपाय शोधले जातात. भारतातील संशोधक विद्यार्थी केवळ देशाच्याच नव्हे तर जगाच्या समस्यांवर उपाय शोधू शकतात. नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणातही संशोधनावर भर देण्यात आला असून बहु- शाखीय अभ्यासक्रम आणि समग्र शिक्षणालाही चालना दिली जात आहे, असेही त्या म्हणाल्या.

विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगारनिर्मितीसाठी करावा- राज्यपाल

देश विदेशातील विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी करावा; गरिबी, वंचितता, युद्ध, अस्थिरता आणि अन्य कारणांमुळे समाजाच्या परिघाबाहेर जगणाऱ्या लोकांचाही विचार करावा, असे आवाहन श्री. राधाकृष्णन यांनी यावेळी केले.

बदलत्या काळानुसार कृत्रिम बुद्धिमत्ता, मशीन लर्निंग सारखे क्षेत्र उदयास येत असून यामुळे अनेक नोकऱ्या कालबाह्य ठरतील. तथापि, त्यामुळे अनेक नवीन रोजगारही निर्माण होणार असून या क्षेत्राचे ज्ञान घेणाऱ्या विद्यार्थ्यांना निश्चितच नवीन संधींचा लाभ होणार आहे, असेही राज्यपाल म्हणाले.

सिम्बायोसिस जगभरातील विद्यार्थ्यांना आणि विशेषतः अफगाणिस्तानसह अन्य देशांतील मुलींसाठी ऑनलाइन पदवी अभ्यासक्रम राबविते, हे अत्यंत कौतुकास्पद आहे. सिम्बायोसिसने जगातील विद्यार्थ्यांसाठी उत्कृष्ट शैक्षणिक वर्ग चालवावेत असे सांगून ज्ञानाचा प्रकाश जगाच्या कानाकोपऱ्यात पसरवला पाहिजे, असेही ते म्हणाले.

डॉ. मुजूमदार म्हणाले, देशात एक हजारावर विद्यापीठे असून यापैकी सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ एक आहे. मूल्यांविरहीत शिक्षण हे विकृतीला जन्म देते. या विद्यापीठात शिक्षण, संशोधन, व्यवसाय, आदी बाबींसह विशेषत: मूल्य शिक्षण देण्यावर भर देण्यात येतो. ‘वसुधैव कुटुंबकम’ संकल्पनेवर काम करुन जागतिक पातळीवर ज्ञानदानाचे काम करण्यात येत आहे. भारताचे नाव विदेशात पोहोचविण्याचे काम करीत आहे.

यावेळी कुलगुरू डॉ. रमण यांनी विद्यापीठ वार्षिक अहवालाचे वाचन केले, विद्यापीठाच्या विविध कॅम्पसमध्ये भारतातील विविध राज्यातील विद्यार्थ्यांसह जगभरातील 85 देशातील विद्यार्थी शिकत असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी राष्ट्रपती श्रीमती मुर्मू यांच्या हस्ते उत्कृष्ट परदेशी विद्यार्थ्याचा पुरस्कार नायजेरीया देशाचा डिलाईट पीटर्स या विद्यार्थ्याला देण्यात आला. तसेच १२ विद्यार्थ्यांना सुवर्णपदके प्रदान करण्यात आली. तसेच विद्यापीठात शिकणाऱ्या ३५ देशाच्या विद्यार्थी प्रतिनिधींनी आपल्या देशाचे राष्ट्रीयध्वज राष्ट्रपती यांच्याकडे प्रदान करून एकत्रित केले.

डॉ. येरवडेकर यांनी स्वागतपर मनोगत व्यक्त केले. यावेळी विविध विद्या शाखेचे अधिष्ठाता, प्राचार्य आदी उपस्थित होते.

0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *