जिल्ह्यातील 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर – जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून महिलेचा मृत्यू, दोन जखमी
सिंधुदुर्गनगरी, दि. 23 (जि.मा.का.) – जिल्ह्यात अतिवृष्टी झाल्यामुळे कणकवली तालुक्यातील रांजणवाडी येथे घरावर दरड कोसळून झालेल्या दुर्घटनेत संगिता प्रकाश जाधव (वय 40) या महिलेचा मृत्यू झाला असून प्रकाश शांताराम जाधव (वय 47) बळीराम कृष्णा जाधव (वय 80) या दोघांवर उपचार सुरु आहेत. जिल्ह्यातील एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्यात आले आहे. अजूनही हवामान खात्याने दिलेल्या इशाऱ्यानुसार पावसाची शक्यता असल्याने नागरिकांनी सतर्क राहून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी केले आहे.
तालुकानिहाय अनुक्रमे स्थलांतरीत कुटुंबाची संख्या आणि व्यक्तींची संख्या पुढीलप्रमाणे – दोडामार्ग एकूण 107 कुटुंबांतील 425 व्यक्ती, सावंतवाडी 84 कुटुंबातील 451, वेंगुर्ला 2 कुटुंबातील 11 व्यक्ती, कुडाळ 72 कुटुंबातील 273 व्यक्ती, मालवण 7 कुटुबांतील 26 व्यक्ती, कणकवली 3 कुटुंबातील 22 व्यक्ती, देवगड 15 कुटुंबातील 63 व्यक्ती, अशा एकूण 290 कुटुंबातील 1271 व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
एनडीआरएफची दोन पथके होणार दाखल
जिल्ह्यामध्ये सावंतवाडी आणि दोडामार्ग या दोन ठिकाणी एनडीआरएफचे प्रत्येकी एक पथक आज साधनसामग्रीसह दाखल होणार आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली. अद्यापही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिल्याने नागरिकांनी विशेषत: नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी सतर्क राहून सुरक्षिततेच्या दृष्टीकोनातून प्रशासनाला सहकार्य करावे.अधिक माहितीसाठी 1077 या टोल फ्री क्रमांकावर तसेच जिल्हा नियंत्रण कक्ष 02362-228847 क्रमांकावर संपर्क करावा. असे आवाहनही त्यांनी केले आहे.