जनसुविधेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच फलदायी ठरतील : कृषिमंत्री दादाजी भुसे
Summary
मालेगाव, दि. 21 (उमाका वृत्तसेवा): तळागाळातील आदिवासी, दलित, गरीब जो कोणी समाजातील वंचित घटक आहे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने जनसुविधेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच फलदायी ठरतील. असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे […]
मालेगाव, दि. 21 (उमाका वृत्तसेवा): तळागाळातील आदिवासी, दलित, गरीब जो कोणी समाजातील वंचित घटक आहे, त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र व राज्य शासनाच्या पुढाकाराने जनसुविधेच्या माध्यमातून राबविण्यात येणारे उपक्रम निश्चितच फलदायी ठरतील. असा विश्वास राज्याचे कृषी व माजी सैनिक कल्याण मंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केला.
पंचायत समितीच्या सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना, ग्रामीण तालुकास्तरीय पुरस्कार वाटप व जनसुविधेच्या मंजूर कामांचे आदेश वाटपाचा कार्यक्रम कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते आयोजित करण्यात आला होता. यावेळी मंत्री श्री.भुसे बोलत होते. यावेळी पंचायत समितीच्या उपसभापती सरला शेळके, जिल्हा परिषदेचे सदस्य दादाजी शेजवळ, पंचायत समिती सदस्य भगवान मालपुरे, गट विकास अधिकारी जितेंद्र देवरे, कृषी अधिकारी किरण शिंदे, बापू पवार, भिकन शेळके, कृष्णा ठाकरे यांच्यासह सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, ग्रामसेवक, पुरस्कार्थी, लाभार्थी आदि उपस्थित होते.
मालेगाव पंचायत समिती जनसुविधा योजनेतंर्गत मालेगाव व नांदगाव तालुक्यातील एकूण ३५ गावातील विविध विकासकामे करण्यासाठी शासनाने २ कोटी ६७ लाखांचा निधी मंजूर केला आहे. त्या अनुषंगाने मालेगाव पंचायत समितीला २ कोटी ५२ लाखाचा निधी प्राप्त झाला असून कृषिमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते एकूण २४ गावांसाठी जनसुविधा योजना 2020-21 साठी विविध विकासकामे करण्यासाठी १ कोटी ६६ लाख मंजूर निधीच्या कामांचे संबंधित गावचे सरपंच व ग्रामसेवक यांना कार्यारंभ आदेशाचे वाटप मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आले.
जनसुविधेच्या ज्या कामांचे आदेश याठिकाणी वितरीत करण्यात आले आहेत, त्यातील कामे ही दर्जेदार पध्दतीने होईल याची सर्वांनी काळजी घेण्याचे आवाहन करतांना मंत्री श्री.भुसे पुढे म्हणाले, तालुक्यात एकूण मंजूर झालेली घरकुले किती, प्रगतीपथावर किती, अद्याप कामे सुरू न झाल्याची कारणे, किती लाभार्थ्यांना लाभाचा हप्ता प्रदान करण्यात आला. याचा नियमीत आढावा घेण्याच्या सुचना त्यांनी यावेळी दिल्या. तर या विकासकामांचा तळागाळातील लाभार्थ्यांशी थेट संवाद साधून या कामांना गती देण्याची विनंती उपसभापती श्रीमती शेळके यांना त्यांनी केली. तर पात्र लाभार्थी त्याला मिळणाऱ्या लाभापासून वंचित राहत असेल तर संबंधितांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचनाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी दिल्या.
सर्वसामान्य जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न केले पाहिजे. घरकुलाच्या यापुर्वी 2011 च्या सर्वेक्षणाच्या याद्या होत्या. त्यानंतर आता ‘ड’ यादीमध्ये जे पात्र लाभार्थी आहेत त्यांची नावे आलेली नाहीत. आणि खऱ्या अर्थाने जे पात्र लाभार्थी यापासून वंचित आहेत, अशांना प्राधान्य क्रमाने घरकुल मिळाले पाहिजे याकरिता प्रशासनाने त्यासंदर्भातील कामकाज केले पाहिजे अशी अपेक्षाही मंत्री श्री.भुसे यांनी यावेळी व्यक्त केली.