चंद्रपूर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात डॉक्टर व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत – पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांची वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांची बैठक. वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम पूर्ण करण्याची मागणी
Summary
मुंबई, दि.२५ : चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण करा तसेच शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय […]
मुंबई, दि.२५ : चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या कालावधीत पूर्ण करा तसेच शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत अशी मागणी इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्याकडे केली.
चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालय बांधकामाच्या समस्यांबाबत मंत्रालयातील वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख यांच्या दालनात बैठक पार पडली. या बैठकीला इतर मागास बहुजन कल्याण विकास मंत्री तथा चंद्रपूरचे पालकमंत्री विजय वडेट्टीवार, वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय, वैद्यकीय शिक्षण संचालक डॉ.दिलीप म्हैसेकर, दूरदृश्यप्रणालीव्दारे चंद्रपूरचे जिल्हाधिकारी अजय गुल्हाणे, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे अधिष्ठाता डॉ.अविनाश टेकाडे यासह एचएससीसी या कंपनीचे अधिकारी या बैठकीला उपस्थित होते.
मंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम अत्यंत संथ गतीने सुरू आहे हे काम तातडीने पूर्ण करण्यात यावे. जिल्ह्यातील जनतेला आरोग्य सुविधा उत्कृष्टरित्या मिळावी यासाठी शासकीय महाविद्यालयातील डॉक्टर (विषय तज्ज्ञ) व कर्मचारी यांची पदे तातडीने भरावीत, जेवढ बांधकाम पूर्ण झाले आहे त्यामध्ये विद्युतीकरण व पाणीपुरवठा ही सुरळीत करण्यात यावा व पूर्ण झालेल्या इमारती शासनाकडे हस्तांतरित करण्यात याव्यात. शासकीय महाविद्यालयाचा पाण्याचा प्रश्नदेखील तातडीने सोडवावा.वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाकरिता पूर्णवेळ अधिष्ठाता पदाची भरती व्हावी, हाफकीनकडून जी औषधे खरेदी केली जातात त्याबाबतच्या नियमावलीमध्ये शिथिलता देण्यात यावी, अशी मागणी मंत्री विजय वडेट्टीवार यांनी केली.
मंत्री अमित देशमुख यावेळी म्हणाले, चंद्रपूरचे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकाम दिलेल्या मर्यादेत पूर्ण करण्यासाठी वैद्यकीय शिक्षण विभागाकडून कार्यवाही करण्यात येईल. महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे लवकरच वर्ग एक व वर्ग दोनची पदभरती प्रक्रिया सूरू होणार आहे. तर वर्ग तीनची पदभरती वैद्यकीय शिक्षण संचालक कार्यालयाकडून होईल. तसेच अधिष्ठाता यांच्या अखत्यारित्य त्यांना वर्ग चारची पदे भरता येतील. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रूग्णालयाचे बांधकामासाठी अपुऱ्या असलेल्या जागेच्या प्रश्नासाठी जिल्हाधिकारी यांनी स्थानिक प्रशासनासोबत बैठक घेवून तातडीने कार्यवाही करावी. ज्या इमारतींचे बांधकाम पूर्ण झाले आहे अशा निवासी इमारतींचे विद्युतीकरण व पाणीपुरवठा सुरळीत करून त्याचे तातडीने संबधित विभागाकडे हस्तांतरीत करण्यात येतील, अशी ग्वाही यावेळी मंत्री अमित देशमुख यांनी दिली.