क्रीडा संकुलाच्या पायाभूत सुविधांसाठी आवश्यक बाबींची तत्काळ पूर्तता करावी – क्रीडामंत्री सुनील केदार
Summary
नागपूर, दि. 30: देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व […]
नागपूर, दि. 30: देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रीडा संकुल होण्यासाठी आवश्यक त्या सर्व सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यात येतील. कुशल मनुष्यबळ, क्रीडा संकुलासाठी लागणारी अतिरिक्त जागा, वीज, पाणीपुरवठा आदी पायाभूत सुविधांसाठी आवश्यक सर्व बाबींची पूर्तता करण्याचे आदेश युवक कल्याण व क्रीडा मंत्री सुनील केदार यांनी आज येथे दिले.
विभागीय आयुक्त कार्यालयात आयोजित विभागीय क्रीडा संकुलाच्या आढावा बैठकीत ते बोलत होते. विभागीय आयुक्त श्रीमती प्राजक्ता लवंगारे–वर्मा, जिल्हाधिकारी श्रीमती आर. विमला, क्रीडा उपसंचालक शेखर पाटील, कार्यकारी अभियंता जनार्दन भानुसे, आरोग्य उपसंचालक डॉ. संजय जायस्वाल, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. देवेंद्र पातूरकर, जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड आदी उपस्थित होते.
मानकापूर विभागीय क्रीडा संकुल परिसरात चांगले क्रीडा वातावरण तयार व्हावे, या ठिकाणाहून आंतरराष्ट्रीय दर्जाचे खेळाडू घडावेत. त्यामुळे या क्रीडा संकुलात सर्वोत्कृष्ट सुविधा निर्माण करण्यावर भर द्यावा. देशातील क्रीडापटूंनी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत आतापर्यंतची उत्कृष्ट कामगिरी केली असून, त्याचा देशाला अभिमान आहे. त्यामुळे भविष्यात चांगले खेळाडू घडविण्यासाठी त्याच दर्जाची क्रीडांगणेही निर्माण करण्यावर राज्याच्या क्रीडा विभागाचा भर राहणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
शहरी भागासह ग्रामीण भागातून येणारे क्रीडापटूही उच्च दर्जाची कामगिरी करु शकतात. त्यांना लागणाऱ्या सोयीसुविधा महत्त्वपूर्ण ठरतात. त्यामुळे विदर्भातील विविध क्रीडा प्रकारातील खेळाडूंना नागपूर येथे सोयीसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावेत, असे श्री. केदार म्हणाले.
विभागीय क्रीडा संकुलात सुरु असलेले बांधकाम, युवा वसतीगृह बांधकाम, पॅव्हेलियन, 400 मिटर ट्रॅक, क्रीडा संकुलाच्या मागील बाजूचे अतिक्रमण रोखण्यासाठी आवारभिंतीचे बांधकाम करा, ‘मेडा’कडून सौर पॅनेल बसविणे, यासह इनडोअर स्टेडियममधील एलईडी दिवे बसविण्याबाबत चर्चा करण्यात आली. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या क्रीडा सुविधा निर्माण करणे तसेच संकुलाचे व्यवस्थापन करताना सिंथेटीक ट्रॅक, बहुद्देशीय सभागृह बांधकाम, मुला-मुलींचे वसतीगृहांचे बांधकाम, आदी सुविधा निर्मिती करणे, जलतरण तलाव, हॉकी ॲस्ट्रोटर्फ, अद्ययावत शुटींग रेंज, स्वतंत्र बॅडमिंटन हॉल, तसेच विविध क्रीडा प्रकारांसाठी लागणारे सुविधांचे बांधकाम करणे, उपलब्ध सुविधांची देखभाल व दुरुस्ती करण्याबाबतचे आदेशही यावेळी त्यांनी दिले.
शासन निर्णयानुसार व्यवहार सल्लागार, संपूर्ण प्रकल्पासाठी विधी सल्लागार आणि वास्तुशास्त्रज्ञाची निवड करण्याबाबतही आढावा घेण्यात आला. विभागीय क्रीडा संकुलाच्या बाजूला असलेल्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या जागेतून रस्ता निर्मितीसाठी आवश्यक असलेली जागा मिळावी, आदी विषयांवर यावेळी मंत्री केदार यांच्या उपस्थितीत चर्चा करण्यात आली.