महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

कलानगर जंक्शन उड्डाणपुलाच्या मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिका वाहतुकीसाठी खुली

Summary

मुंबई, दि. २८ : कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव […]

मुंबई, दि. २८ : कलानगर जंक्शन येथील उड्डाणपुलाच्या वरळी सीलिंक ते बांद्रा-कुर्ला संकुल मार्गिकेचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते आज उद्घाटन झाले. उड्डाणपुलाची ही मार्गिका आज वाहतुकीसाठी खुली झाल्याने, या परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

यावेळी नगरविकास व सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन, पर्यावरण तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे, वस्त्रोद्योग तथा मुंबई शहर जिल्ह्याचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, एमएमआरडीएचे आयुक्त एस. व्ही. आर. श्रीनिवास आदी उपस्थित होते.

मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांच्या हस्ते आणि मान्यवरांच्या उपस्थितीत फित कापून आणि कोनशिलेचे अनावरण करून उड्डाणपुलाची मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

उद्घाटनानंतर माध्यमांशी बोलताना मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले, या परिसरात माझे बालपण गेले. १९६६ पासून आम्ही या परिसरात राहतो आहोत. या परिसराशी निगडीत खूप आठवणी आहेत. आता या परिसरात खूप वस्ती वाढली आहे. बीकेसी सारखे संकुलही उभे राहिले आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली होती. हा उड्डाणपूल वाहतुकीसाठी खुला झाल्याने आता कलानगर जंक्शन येथे आणि परिसरात वाहतूक कोंडी होणार नाही.’’

कलानगर उड्डाणपुलाविषयी…

कलानगर जंक्शन येथे पश्चिम द्रुतगती महामार्ग, बांद्रा वरळी सागरी मार्ग / एस. व्ही मार्ग, सायन/ धारावी रस्ता, बांद्रा-कुर्ला संकुल जोडरस्त्यासहीत इतर दोन मार्ग येऊन मिळतात. त्यामुळे जंक्शनवर वाहतूक कोंडी होते. या उड्डाणपुलामुळे वाहतुकीची कोंडी सुटण्यास मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेळेत साधारण १० मिनिटे बचत होणार आहे.

या प्रकल्पांत तीन मार्गिका आहेत. पहिली वरळी बांद्रा सागरी मार्गाकडून बांद्रा-कुर्ला संकुलाकडे जाण्यासाठी ८०४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका, दुसरी बांद्रा-कुर्ला संकुलाकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ६५३.४० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आणि तिसरी धारावी जंक्शनकडून बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाण्यासाठी ३४०० मीटर लांबीची व ७.५० मीटर रुंदीची दोन पदरी मार्गिका आहे.

या प्रकल्पासाठी १०३ कोटी ७३ लाखांची तरतूद करण्यात आली होती. एकूण तीन मार्गिकेपैकी बांद्रा-कुर्ला संकुल ते बांद्रा वरळी सागरी मार्गाकडे जाणारी मार्गिका २१ फेब्रुवारी २०२१ रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात आली आहे.

त्यानंतर आज दि. २८ जून २०२१ रोजी बांद्रा वरळी सागरी मार्ग ते बांद्रा-कुर्ला संकुल ही मार्गिका वाहतुकीसाठी खुली करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *