करोनाबाधितांची संख्या ४५ लाखांहून अधिक; एका दिवसात ९६,५५१ नवे रुग्ण
जगभरात थैमान घालणाऱ्या करोना महामारीचा देशातील विळखा दिवसागणिक वाढतच चालला आहे. भारतातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाखांच्या पुढे गेली आहे तर मृत्यूची संख्या ७६ हजार २७१ इतकी झाली आहे. महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्रप्रदेश,कर्नाटक, उत्तर प्रदेश आणि दिल्ली या सहा राज्यात करोनाचा प्रादुर्भाव सर्वात आधिक आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांपैकी ५० टक्केंपेक्षा जास्त रुग्ण या सहा राज्यात आहेत. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासांत एक हजार २०९ जणांचा मृत्यू झाला आहे.
गेल्या २४ तासांत देशात ९६ हजार ५५१ नवीन करोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ४५ लाख ६२ हजार ४१५ इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे ३५ लाख ४२ हजार ६६४ जणांनी करोनावर मात केली आहे. भारतातील करोना रुग्ण बरे होण्याचं प्रमाण इतर देशांपेक्षा चांगलं आहे. देशात सध्या ९ लाख ४३ हजार ४८० करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
देशात करोना चाचण्या वाढल्यामुळे रुग्णांचेही प्रमाण वाढत आहे. आयसीएमआरने दिलेल्या माहितीप्रमाणे देशात आतापर्यंत ११ कोटी ६३ लाख ५४३ करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. गुरुवारी पाच ११ लाख ६३ हजार ५४२ करोना चाचण्या घेण्यात आल्या आहेत.
‘आयसीएमआर’ने राज्यांना दोन नेमक्या सूचना केल्या आहेत. ताप वा खोकला वा श्वास घेण्यास त्रास होत असलेल्या व्यक्तींची जलद प्रतिद्रव चाचणी नकारात्मक आली तर त्यांची आरटी-पीसीआर नमुना चाचणी करणे गरजेचे आहे. तसेच, ज्या व्यक्तींमध्ये करोनाची कोणतीही लक्षणे नसतील आणि त्यांची जलद प्रतिद्रव चाचणी नकारात्मक आली तर दोन वा तीन दिवसांनंतर अशा व्यक्तींमध्ये लक्षणे दिसू लागली तर त्यांचीही आरटी-पीसीआर चाचणी केली पाहिजे, असे स्पष्ट आदेश राज्यांना देण्यात आले आहेत.