BREAKING NEWS:
महाराष्ट्र मुंबई हेडलाइन

ऊर्जामंत्री डॉ.नितीन राऊत उद्या २९ जुलै रोजी चिपळूण दौऱ्यावर; वीज यंत्रणा दुरुस्तीचा घेणार आढावा

Summary

मुंबई, दि. 28 : अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे उद्या दि. 29 जुलै रोजी या परिसराचा दौरा करणार […]

मुंबई, दि. 28 : अतिवृष्टीमुळे महावितरण व महापारेषणच्या कोकण व पश्चिम महाराष्ट्रातील वीज यंत्रणेचे अतोनात नुकसान झाले असून चिपळूण (जि. रत्नागिरी) येथील नुकसानग्रस्त भागाचा आढावा घेण्यासाठी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत हे उद्या दि. 29 जुलै रोजी या परिसराचा दौरा करणार आहेत.

मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील १९२७ गावे व शहरातील ९ लाख ६० हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला असून महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीची कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे.

पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण १४ हजार ७३७  रोहित्रे बंद पडली असताना ९ हजार २६२ रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या ४७४ वीज वाहिन्यांपैकी आता २६८ वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्वीचिंग केंद्रापैकी ४४ केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झाले आहे.

चिपळूण येथे पुरामुळे नागरिकांचे तसेच महावितरण आणि महापारेषणच्या यंत्रणेचे प्रचंड नुकसान झाले आहे. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले. अशा परिस्थितीतही नदीला आलेल्या पुराचा धीरोदात्तपणे सामना करत, डोंगरदऱ्यांतून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. याबद्दल त्यांच्या कामगिरीचे ऊर्जामंत्री डॉ.राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे.

डॉ.राऊत हे दौऱ्यात चिपळूण तालुक्यातील खेर्डी, वशिष्ठी नदीपूल परिसर तसेच  मुरादपूर या प्रत्यक्ष काम सुरू असलेल्या ठिकाणी जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहे. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. या दौऱ्यात ते पूरग्रस्त गरजवंताना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करणार आहेत. याशिवाय माध्यम प्रतिनिधींशीही संवाद साधणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *