उरणमधून अपहरण करण्यात आलेली दोन महिन्यांची मुलगी पनवेलमध्ये सापडली
पनवेल : उरणमधील नवघर येथून सोमवारी (१५ मार्च) सकाळी साडेअकराच्या सुमारास दोन महिन्याच्या मुलीचे अपहरण करण्यात आले होते. डोस पाजण्याच्या बहाण्याने या मुलीला एका अज्ञात महिला आरोपीने पळवून नेले होते. अवघ्या पाच तासात या आरोपीला पनवेलमधून पकडण्यात यश आलं अल्याने पोलिसांचे सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
मुलीला डोस पाजतो असे सांगून, दोन महिन्यांच्या मुलीला एका अज्ञात महिला आरोपीने पळवून नेले होते. याबाबत उरण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी युद्ध पातळीवर शोधमोहीम सुरू केली. सर्व ठिकाणी नाकाबंदी करून प्रत्येक गाडीची तपासणी करण्यात सुरुवात केली. एका रिक्षा चालकाने त्या महिलेला नवघर इथून दास्तान फाट्यावर सोडल्याची माहिती पोलिसांना मिळाली. दास्तान फाट्यावरील रिक्षा स्टँडवर चौकशी केली असता संबंधित महिला गुणे हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती मिळाली. गुणे हॉस्पिटलमध्ये चौकशी केल्यावर तेथील सीसीटीव्ही फुटेजमध्ये आरोपी महिला गुणे हॉस्पिटलमध्ये आल्याची निष्पन्न झाले. परंतु त्यानंतर भाजीमंडईच्या रिक्षा स्टँडवरून ती महिला लहान मुलीला घेऊन खांदा कॉलनीतील कृष्णा हॉस्पिटलमध्ये गेल्याची माहिती, तेथील एका रिक्षाचालकाकडून मिळाली. अखेर आरोपी महिला आणि दोन महिन्यांची मुलगी कृष्णा हॉस्पिटलमध्ये सापडली. पोलिसांनी आरोपी महिलेला ताब्यात घेऊन लहान मुलीला आई वडिलांकडे सुपूर्द केले. पाच तास चाललेल्या या थरार नाट्यात पोलिसांनी यश संपादन केल्याने सर्व ठिकाणाहून त्यांचे कौतुक होत आहे.
उरण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र बुधवंत, सहाय्यक पोलीस निरीक्षक तुकाराम निंबाळकर, शिवाजी होनमाने, राजू पठाण यांच्यासह त्यांच्या सहकाऱ्यांनी या गुन्ह्याचा तपास केला. याशिवाय पनवेल पोलिस शहर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकारी, न्हावाशेवा आणि तळोजा पोलीस स्टेशनच्या गुन्हे प्रकटीकरण कक्षाचे अधिकाऱ्यांनी समांतर तपास करीत अवघ्या पाच तासांतच आरोपीला पकडून लहान मुलीला आई वडिलांकडे सुपूर्द केल्याने पोलिसांचे सर्वच स्तरावरून त्यांचे कौतुक होत आहे.
✍️प्रशांत जाधव
नवी मुंबई न्यूज रिपोर्टर