उन्हाळी हंगामात अखंडित सिंचनासाठी अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवावीत – जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील

मुंबई, दि. २५ :- शेतकऱ्यांना उन्हाळी हंगामात अखंडित सिंचन सुविधा मिळावी यासाठी वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यावर भर द्यावा. यासाठी आवश्यक त्या उपाययोजना तातडीने राबवाव्यात आणि संभाव्य तांत्रिक अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त रोहित्रे तयार ठेवावीत, असे निर्देश जलसंपदा मंत्री (गोदावरी व कृष्णा खोरे विकास महामंडळ) राधाकृष्ण विखे- पाटील यांनी दिले.
विधानभवनात सन २०२४-२०२५ उन्हाळी हंगामासाठी सांगली पाटबंधारे कालवा सल्लागार समितीची बैठक. (टेंभू उ.सिं.यो., कृष्णा कोयना सिंचन प्रकल्पांतर्गत ताकारी व म्हैसाळ, आरफळ कालवा व कृष्णा कालवा.) व धोम-कण्हेर, उरमोडी व तारळी प्रकल्पांचे सन २०२४-२०२५ उन्हाळी हंगामासाठी कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. त्यावेळी जलसंपदा मंत्री श्री. विखे पाटील बोलत होते.
बैठकीस उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले, आमदार सुरेश खाडे, गोपीचंद पडळकर,विश्वजित कदम, रोहित पाटील, सुहास बाबर, सदाभाऊ खोत, अरुण लाड, कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक अतुल कपोले व जलसंपदा व ऊर्जा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, उपसा सिंचन योजना सुरळीत ठेवण्यासाठी कंत्राटी एजन्सी नेमण्यात याव्यात, जेणेकरून शेतकऱ्यांना सुलभ पद्धतीने सिंचन आवर्तन देता येईल. तसेच उन्हाळी हंगामासाठी प्रकल्पनिहाय सिंचनासाठी पाणीवापर व सिंचन आवर्तनाचे नियोजन करावे, असेनिर्देशही त्यांनी यावेळी दिले.
यावेळी सांगली पाटबंधारे अंतर्गत टेंभू, ताकारी ,म्हैसाळ व आरफळ व सातारा पाटबंधारे प्रकल्प मंडळ येथील धोम, उरमोडी, कण्हेर व तारळी प्रकल्पांचा आढावा घेऊन उपलब्ध पाणीसाठा, पाणीवाटपाबाबत चर्चा झाली .
0000