महाराष्ट्र संपादकीय हेडलाइन

अँग्री यंग मॅन… रविवार, २३ जून २०२४ स्टेटलाइन : डॉ. सुकृत खांडेकर

Summary

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा तब्बल पन्नास हजारांचे मताधिक्य मिळवून विजय झाला, त्यामागे राणे परिवार, त्यांचे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपाची शिस्तबद्ध केडर यांनी केलेला प्रचार, दोन महिने अहोरात्र घेतलेले परिश्रम […]

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री व माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा तब्बल पन्नास हजारांचे मताधिक्य मिळवून विजय झाला, त्यामागे राणे परिवार, त्यांचे हजारो निष्ठावंत कार्यकर्ते आणि भाजपाची शिस्तबद्ध केडर यांनी केलेला प्रचार, दोन महिने अहोरात्र घेतलेले परिश्रम मोलाचे आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सिंधुदुर्ग-रत्नागिरी या दोन जिल्ह्यांत घराघरात नारायण राणे यांचे उमेदवार म्हणून नाव आणि भाजपाचे निवडणूक चिन्ह कमळ पोहोचवले. राणेंची लोकप्रियता, त्यांचे पाच दशकांतील सार्वजनिक काम, कोकणच्या विकासासाठी त्यांनी केलेला पाठपुरावा ही सर्व त्यांच्या विजयामागे जमेची बाजू होतीच. पण माजी खासदार निलेश राणे यांचे अचूक नियोजनही फळाला आले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघात भाजपाचे प्रथमच कमळ फुलले, त्यामागे अनेकांचे हात आहेत, पण भाजपाचे लढाऊ नेते आमदार नितेश राणे यांची कल्पकता, मेहनत, आखणी, स्ट्रटेजी ही सर्व आश्चर्यकारक व अद्भुत होती. नारायण राणे आपले वडील आहेत म्हणून त्यांनी सर्व तनमन प्रचारात झोकून दिले होतेच, पण कोकणातील रत्नागिरी – सिंधुदुर्ग मतदारसंघात कमळ फुलविण्यासाठी त्यांनी जीवाचे रान केले. भाजपाला यश मिळवून देण्यासाठी त्यांनी राणे परिवाराची सारी प्रतिष्ठा पणाला लावली.
सन २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेचा उमेदवार जवळपास दीड लाखांचे मताधिक्य मिळवून निवडून आला होता. तो फरक तोडून नारायण राणेसाहेब पन्नास हजारांचे मताधिक्य मिळवून निवडून आले. उबाठा सेनेच्या उमेदवाराला मिळालेल्या दीड लाखांच्या मताधिक्यात राजापूर-लांजा विभागाचा मोठा वाटा होता, त्यावरच नितेश राणे यांनी प्रहार केला. रत्नागिरीत गेल्या वेळी उबाठा सेनेला मिळालेले मताधिक्य कमी करायचे, तर सिंधुदुर्गात आपले मताधिक्य विक्रमी मिळाले पाहिजे, अशी रणनिती नितेश यांनी आखली व ती यशस्वी करून दाखवली. नारायण राणे यांना सर्वाधिक मताधिक्य हे नितेश राणे यांच्या विधानसभा मतदारसंघातून मिळाले. नितेश यांचे निवडणूक व्यवस्थापन कौशल्य लक्षात घेऊनच भाजपाने त्यांच्यावर पालघर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी सोपवली होती व तेथेही भाजपाचा उमेदवार विजयी झाला.
प्रदेश भाजपाने त्यांची प्रवक्ता म्हणून नेमणूक केल्यापासून उबाठा सेनेचे नेते व विशेषत: मातोश्रीवरील हल्ल्याला धार चढली. उबाठा सेनेच्या प्रवक्त्यांनी सकाळी पत्रकार परिषद घेतली की, लगेचच त्याला दमदार उत्तर देणारी पत्रकार परिषद घेण्याचा सपाटा नितेश यांनी सुरू केला. नितेश यांना रोज पत्रकार परिषद घेणे जमेल का असे अनेकांना वाटले होते, प्रत्यक्षात सकाळी संजय राऊत यांची पत्रकार परिषद झाली की, लगेचच नितेश राणे यांची त्याला उत्तर म्हणून पत्रकार परिषद होऊ लागली. उबाठाने केलेल्या आरोपांना किंवा टीकेला उत्तर देण्यात नितेश राणे यांनी कधीही वेळकाढूपणा केला नाही. ते मुंबईत असो वा कणकवलीत त्यांनी कधीही सुट्टी घेतली नाही. शिवाय त्यांचे प्रश्न अचूक व मार्मिक व थेट उबाठा सेनेला भिडणारे असल्याने भाजपाचा हेतू साध्य होतो आहे. योग्य नेत्यावर योग्य जबाबदारी असे भाजपामधील अनेकांना वाटते. भाजपाकडे अनेक प्रवक्ते आहेत, पण उबाठा सेनेतील खाचाखोचा पूर्ण ठाऊक असल्याने नितेश यांचा हल्ला अधिक धारदार असतो व त्याला मीडियातून मोठी प्रसिद्धी मिळते व त्याचा लाभ भाजपाला पक्ष म्हणून होत असतो.
उबाठा सेना व मातोश्रीवर जोरदार ‘प्रहार’ करणारा भाजपाचा नेता अशी नितेश राणे यांची ओळख निर्माण झाली आहे. पण त्याचबरोबर भाजपाचा हिंदू चेहरा म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जात आहे. मुंबईत घाटकोपर, धारावी किंवा मालवणीमध्ये त्यांनी हिंदूंच्या आक्रोश मोर्चात सहभागी होऊन जी आक्रमक भाषणे केली, त्याला खरोखरच तोड नाही. त्यांच्या भाषणांना प्रभावित होऊन, सोशल मीडियावर – नितेशजी आप संघर्ष करो, हिंदू समाज आप के साथ है… असा पाठिंबा व्यक्त झाला.
धारावीतील हिंदूंकडे पुन्हा कोणी वाकड्या नजरेने पाहिल्यास आम्ही तांडव करू (पोलीस प्रशासनाने) जिहादींचे लाड करण्यापेक्षा हिंदूंना सुरक्षित ठेवावे असे त्यांनी आवाहन केले आहे. जिहादींनी येथे अनधिकृत मशिदी व मदरसे उभारण्याऐवजी थेट पाकिस्तानात निघून जावे, अशी कडवट टीका नितेश यांनी केली आहे.
या देशात सर्वधर्मसमभावाचे नाटक चालणार नाही, हा हिंदूंचा देश आहे, हे हिंदूंचे राज्य आहे. देश हिंदूंचा असून हिंदूंचेच हित प्रथम पाहिले पाहिजे. दिल्लीतील ७० टक्के जमीन वक्फ बोर्डाच्या मालकीची आहे, जर वक्फ बोर्ड एवढे चांगले आहे, मग पाकिस्तान, बांगला देश, इराक, इराण देशात का नाही? असा प्रश्न विचारण्याची हिम्मत केवळ नितेश राणेच दाखवू शकतात.
मी मालेगावचा उल्लेख मिनी पाकिस्तान केल्याने अनेकांना मिरच्या झोंबल्या. मला कितीही नोटिसा मिळाल्या तरी मी मालेगावबद्दल बोलणारच, असे ठणाकावून सांगणारे नितेश राणे हे एकमेव हिंदू नेते असावेत. मुंबई हिंदूंची राहिली आहे का? असा नितेश राणे यांनी थेट प्रश्न विचारून राज्यकर्त्यांना, पोलीस प्रशासनाला आणि हिंदू समाजाला आत्मचिंतन करायला लावले आहे. एका ज्वलंत प्रश्नाला त्यांनी वाचा फोडली आहे. मुंबईत मराठी भाषिक किती आणि मुंबईत हिंदू सुरक्षित किती, हे दोन्ही मुद्दे संवेदनशील आहेत. अयोध्येत बाबरी मशीद उद्ध्वस्त झाल्यानंतर उत्तर प्रदेशात कुठेही दंगली झाल्या नाहीत, तर मुंबईत डिसेंबर १९९२ आणि जानेवारी १९९३ मध्ये भीषण दंगली झाल्या. एक हजारांवर हिंदूंच्या हत्या झाल्या. त्यावेळी मुंबई वाचवली ती शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी. या घटनेला आता बत्तीस वर्षे झाली.
आज मुंबईची अवस्था काय आहे? मुंबईतील अनेक मोहल्ले, वस्त्या, वसाहतीत हिंदू राहू शकतात का? तेथे मुक्तपणे वावरू शकतात का? मानखुर्द, कुर्ला, जोगेश्वरी, देवनार, चिता कॅम्प, नागपाडा, डोंगरी, धारावी, मालवणी आदी अल्पसंख्याकांच्या वस्त्यांमध्ये हिंदू घरे घेऊ शकतात का? आजही तेथे साधे उभे राहण्याचीही हिम्मत नाही. कोविड काळात लॉकडाऊनमध्ये मुस्लीम वस्तीत मास्क लावून कोणी फिरत नव्हते.
उलट हिंदूंनी मास्क लावला नसेल, तर महापालिकेचे पथक ५०० रुपये दंड ठोठावत असे. मुंबईचे हे विदारक व भयावह चित्र नितेश राणे यांनी अनेक भाषणांतून मांडले आहे व मांडत आहेत.
रोहिंगे व बांगलादेशींनी मुंबईत मोठे आक्रमण केले आहे, त्यांची नेमकी संख्या किती आहे हे पोलीस सांगू शकत नाहीत. मुंबई म्हणजे ‘आवो जावो घर तुम्हारा’, अशी अवस्था आहे. राज्य व केंद्र शासनाच्या जमिनीवर चौफेर अतिक्रमणे याच घुसखोरांनी केली आहेत. त्यांना हटविण्यासाठी कोणतीही मोहीम राबवली जात नाही. जर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ बेकायदा बांधकामांवर बुलडोझर फिरवून ती जमीनदोस्त करण्याचे आदेश देतात व कारवाई करायला प्रशासनाला संपूर्ण मोकळीक देतात मग महाराष्ट्रात असे का होत नाही? मराठी मुंबईचे हिरवेकरण चालू असल्याचा इशारा नितेश राणे यांनी दिला आहे. बांगला देशी व रोहिंगे यांना मुंबईत कोण आणतो, असा प्रश्न उपस्थित केला आहे. मुस्लिमांच्या मिरवणुकांमध्ये सर्व नियमांची पायमल्ली केली जाते, पण हिंदूंच्या सणांना, उत्सवांना व मिरवणुकींना कोटेकोर
नियम लावले जातात, हा भेदभाव कशासाठी? असा त्यांचा प्रश्न आहे.
मालेगाव म्हणजे मिनी पाकिस्तान, असे नितेश राणे म्हणाले म्हणून त्यांना नोटीस बजावण्यात आली. पण त्याच मालेगावात तीनशे कोटींची वीजचोरी होते, त्यावर कारवाई कारवाई करण्यासाठी एमएसईबीचे अधिकारी-कर्मचारी किंवा पोलीस पोहोचू शकत नाहीत, याचे उत्तर कोणाकडे नाही. वीजचोरीचा पैसा लव जिहाद व लँड जिहादसाठी वापरला जात असेल, तर ते आणखी गंभीर आहे, असाही त्यांनी जाहीरपणे इशारा दिलेला आहे. लव जिहाद व लँड जिहादविषयी सातत्याने आवाज उठवणारे नितेश राणे हे एकमेव युवानेते आहेत. मुंबईत रस्त्यावर, बाजारात, लोकल ट्रेनमध्ये मुस्लिमांची संख्या विलक्षण वाढली आहे. एखाद्या समाजाची संख्या वाढली याला कोणाचा आक्षेप नाही, पण त्या समाजातील लोकांची विशेषत: तरुणांची अरेरवी व मग्रुरी वाढलेली आहे. यातून भविष्यात शांततेला धोका निर्माण होऊ शकतो, त्यासाठी पोलीस व प्रशासनाने डोळ्यांत तेल घालून काम केले पाहिजे. मुंबई तसेच राज्यातील मुस्लीम व्होट बँक लोकसभा निवडणुकीत उबाठा सेनेच्या पाठीशी भक्कमपणे उभी राहिली. त्यांचे उबाठा सेनेबद्दल अचानक निर्माण झालेले प्रेम हे मोदी व भाजपा नकोत म्हणून उफाळून आलेले आहे…
अँग्री यंग मॅन म्हणून तरुणाईत लोकप्रिय असलेल्या नितेश राणे यांना वाढदिवसानिमित्त ‘प्रहार’ परिवाराच्या वतीने भरघोस शुभेच्छा!
sukritforyou@gmail.com
sukrit@prahaar.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *