BREAKING NEWS:
राजकीय

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघ निवडणूक (भाग-१)

Summary

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. […]

पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या लेखामध्‍ये सर्व मतदान केंद्राध्यक्ष व मतदान अधिकारी यांच्‍या कर्तव्‍ये व जबाबदाऱ्यांबाबत महत्त्वाच्या सूचना थोडक्यात मांडण्‍यात आल्‍या आहेत. निवडणुकीचे काम नि:पक्षपातीपणे व आत्मविश्वासाने पार पाडण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा कार्यरत असतेच. या लेखाचा पहिला भाग आज प्रसिद्ध करण्यात येत आहे त्‍यामुळे मतदार आणि वाचकांनाही या माहितीचा उपयोग होईल, अशी आशा आहे.
          पुणे विभाग पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाची निवडणूक जाहीर झाली आहे. या निवडणुकीचे मतदान 1 डिसेंबर रोजी होणार असून मतमोजणी 3 डिसेंबरला होईल. कोरोनाच्‍या पार्श्‍वभूमीवर राज्‍यात होणारी ही पहिलीच निवडणूक असल्‍याने ‘कोविडपासून सुरक्षित निवडणूक’ हे ध्‍येय्य साध्‍य करण्‍यासाठी निवडणूक यंत्रणा सज्ज आहे.
         निवडणूक कार्यक्रम
         अधिसूचना प्रसिद्ध दिनांक : दि. 5 नोव्हेंबर 2020

नामनिर्देशन पत्र दाखल करणे : दि. 12 नोव्हेंबर 2020 पर्यंत

नामनिर्देशन पत्रांची छाननी  : दि. 13 नोव्हेंबर 2020

नामनिर्देशन पत्र मागे घेणे : दि. 17 नोव्हेंबर 2020

मतदान : दि. 1 डिसेबर 2020

मतमोजणी : दि. 3 डिसेबर 2020
         निवडणुकीसाठी पुण्‍याचे विभागीय आयुक्त हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. उपायुक्‍त (सर्वसाधारण), जिल्‍हाधिकारी, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर हे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी आहेत. भारत निवडणूक आयोगाकडून निवडणूक निरीक्षक नियुक्त करण्यात आले असून मुख्‍य कार्यकारी अधिकारी (खादी व ग्रामोद्योग) हे निवडणूक निरीक्षक म्‍हणून जबाबदारी पार पाडतील.
  निवडणुकीची ठळक वैशिष्‍ट्ये
           मतपत्रिकेवर उमेदवाराच्‍या नावासमोर चिन्ह छापलेली नसतात. मतपत्रिकेतील नावांसमोरील जागेत मतपत्रिकेत मतदार पसंती क्रमांक अंकात १ पासून लिहावयाचा असून ते आकडे मराठी, इंग्रजी, रोमन किंवा भारतीय घटनेतील आठव्या अनुसूचीमध्ये दिलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंकात लिहिण्यास मुभा आहे, परंतु ते शब्दात लिहिता येणार नाहीत.
           मतदारास मतपत्रिकेवर मतदान केंद्रावर उपलब्ध केलेल्या जांभळ्या स्केच पेननेच पसंती क्रमांक लिहावयाचा असतो. त्यामुळे बाण फुलीचा शिक्का दिलेला नसून मतदारांना जांभळा स्केचपेन देवून मत नोंदविण्याची कार्यवाही पूर्ण करुन घेतली जाणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्‍या 11 सप्‍टेंबर 2018 च्‍या निर्देशानुसार राज्य विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतपत्रिकेवरील नोटा (NOTA- None Of The Above) हा पर्याय वगळण्यात आला आहे.
         मतदान प्रक्रियेतील महत्त्वाचे टप्पे

निवडणूक साहित्य स्‍वीकृती व तपासणी

मतदानाच्या आदल्या दिवशीची मतदान केंद्रावरील पूर्वतयारी

प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वीची कामे

मतदानास प्रत्यक्ष सुरूवात व मतदान केंद्राध्यक्ष / कर्मचारी यांची कामे

मतदान केंद्राध्यक्ष यांनी महत्त्वाच्या प्रकरणी करावयाची कार्यवाही

महत्‍त्‍वाचे अहवाल/नमुने

मतदान साहित्‍य परत करणे


पदवीधर मतदार संघासाठी मतपत्रिका पांढऱ्या रंगाची असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग पांढऱ्याच रंगाचे असतील. शिक्षक मतदार संघासाठी मतपत्रिका गुलाबी रंगाच्‍या असून संविधानिक व असंविधानिक लिफाफे आणि अॅड्रेस टॅग गुलाबी रंगाचे असतील.
           कोविड-19 (कोरोना)च्‍या प्रादुर्भावामध्‍ये निवडणूक घेतांना मतदान केंद्रावर आवश्‍यक त्‍या दक्षता घेण्‍याच्‍या सूचना देण्‍यात आल्‍या आहेत. सर्व मतदान केंद्राध्यक्ष / मतदान अधिकारी यांच्‍यासाठी मास्क, फेसशिल्ड, सॅनिटायझर, ग्लोज पुरविले जातील. त्याचा वापर करावा.
          मतदानाच्‍या आदल्या दिवशी करावयाची कार्यवाही
           मतदानाच्‍या आदल्या दिवशी सर्व मतदान केंद्राचे निर्जंतुकीकरण करणे अनिवार्य आहे.  मतदान प्रक्रिया सुलभ होण्‍यासाठी मतदारांना जास्त वेळ रांगेत ताटकळत राहू लागू नये म्हणून त्यांना टोकण वितरण करण्‍यासाठी मदत कक्ष (हेल्‍प डेस्‍क) राहील. त्या ठिकाणी स्थानिक स्तरावरील कर्मचाऱ्याची नियुक्ती करण्यात येईल. मतदान केंद्रावरील रांगेमधील मतदारांना रांगेत सामाजिक अंतर ठेवणे सुलभ जावे तसेच दिव्यांग व ज्‍येष्ठ नागरिक मतदार, पुरुष मतदार आणि स्त्री मतदार यासाठी मतदान केंद्रावर तीन स्वतंत्र रांगा व दोन व्यक्तीमधील सामाजिक अंतर ६ फुटाचे ठेवण्यासाठी या स्वतंत्र रांगेमध्ये ६ फुटाच्‍या अंतरावर चुना पावडरच्‍या सहाय्याने १५ ते २० गोल वर्तुळे चिन्‍हांकित करावीत. ही कार्यवाही मतदान केंद्राच्‍या समोरील जागेतील जागा उपलब्धतेप्रमाणे करावी.
          मतदान केंद्राच्‍या  इमारतीमध्ये किंवा परिसरात पुरुष व स्त्री मतदारासाठी दोन स्वतंत्र खोल्या प्रतीक्षा कक्ष म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव ठेवण्यात याव्यात. ज्यामध्ये खुर्ची,  सतरंजी व इतर व्यवस्था ठेवण्यात येईल. मतदान केंद्रावर हात स्वच्छ करण्‍यासाठी मतदान केंद्राच्‍या येण्‍या-जाण्याच्‍या ठिकाणी साबण/हॅण्‍डवॉश व पाणी ठेवण्याची व्यवस्था केली जाईल. मतदान केंद्रामध्ये येण्या-जाण्याच्‍या ठिकाणी  सॅनिटायझर ठेवले जाईल. आपल्याकडील साहित्यामधील कोविड-१९ च्या प्रादुर्भाव संबंधाने जनजागृती बाबतचे भित्तीपत्रक मतदान केंद्राच्‍या परिसरात दर्शनी भागात लावले जातील. मतदान अधिकारी आणि कर्मचारी यांची मतदान केंद्रावरील बैठक व्यवस्था सामाजिक अंतराच्‍या निकषाप्रमाणे केंद्राध्यक्षांनी करून घ्यावी. मतदान केंद्रावर मतदानासाठी आल्यावर त्या मतदाराकडे मास्क नसल्यास त्यास मास्क पुरविण्यात यावा. मतदारांनी मतदान केंद्रात प्रवेश करण्‍यापूर्वी मतदान केंद्रावर नियुक्त केलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्‍या मार्फत थर्मल स्कॅनरच्‍या सहाय्याने तापमान तपासणी करावी. थर्मल स्कॅनरच्‍या तपासणीमध्ये मतदाराचे तापमान आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने ठरवलेल्या निकषाप्रमाणे म्हणजे ९८.६ फॅरनहिट किंवा 37 अंश सेल्सिअसपेक्षा अधिक आढळल्यास अशा मतदाराचे तापमान पुन्हा दोनदा तपासण्यात यावे. संबंधिताचे तापमान पुन्हा ९८.६oF किंवा ३७०C पेक्षा अधिक दिसून आल्यास संबंधित मतदारास टोकण / प्रमाणपत्र देऊन त्यास मतदानासाठीच्या शेवटच्या तासात मतदानासाठी येण्यास सांगावे. मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये अशा मतदारांना मतदान केंद्रावर मतदानासाठी सुविधा पुरविण्यात यावी. मतदाराची ओळख पटविण्याबाबत कार्यवाही करताना आवश्यकता असल्यास चेहऱ्यावरील  मास्क खाली घेण्यासाठी  सांगण्यात येईल. अलगीकरणातील कोविड-१९ च्या रुग्णांना वैद्यकीय अधिकाऱ्यांच्‍या पर्यवेक्षणामध्ये आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे काटेकोरपणे पालन करून मतदानाच्या शेवटच्या तासामध्ये मतदान नोंदविण्‍यासाठी अनुमती द्यावी.  क्षेत्रिय अधिकारी या संबंधाने त्यांच्‍या क्षेत्रातील मतदान केंद्राच्‍या बाबतीत आवश्यक समन्वय ठेवतील. मतदान प्रतिनिधीच्‍या तपासणी नंतर तापमान विहित केलेल्या मर्यादेपेक्षा जास्त  आढळल्यास त्यास बदली प्रतिनिधी देण्यासाठी परवानगी देण्यात यावी व त्याप्रमाणे अभिलेख्यात त्याची नोंद घ्यावी.
         मतदान केंद्रावरील सुरक्षा व्यवस्था
         प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलीस बंदोबस्त नियुक्त करण्यात येईल. आपल्‍या मतदान केंद्रावर नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांसह आपणांस मतदान केंद्रावर जावयाचे आहे. नियुक्त करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांना मतदानाच्‍या वेळी मतदान केंद्रामध्ये प्रवेश असणार नाही.
  मतदान अधिकाऱ्यांच्या कामाचे स्वरुप
         मतदान केंद्रामध्ये प्रवेश केल्यावर मतदार हा सर्वप्रथम थेट पहिल्या मतदान अधिकारी यांच्‍याकडे जाईल. मतदारास उमेदवार  किंवा प्रतिनिधी यांच्‍याकडून अनौपचारिक ओळखपत्र चिठ्ठी दिली जाते (ओळखपत्र चिठ्ठी – साध्या पांढऱ्या कागदावर मतदाराचे नाव, यादी भाग क्रमांक, अनुक्रमांक आणि मतदान केंद्राचे नाव नमूद असते. (परंतु राजकीय पक्षाचे नाव / उमेदवाराचे नाव नमूद नसावे) ओळखपत्र चिठ्ठीवरून मतदार यादीची चिन्हांकित प्रत पाहून मतदाराची ओळख पटविणे.
           भारत निवडणूक आयोगाने मतदाराची ओळख पटविण्यासाठी दिलेल्या पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा मतदार दर्शवील त्यावरुन ओळख पटविण्याची कार्यवाही हा अधिकारी पूर्ण करेल. मतदाराची ओळख पटल्यानंतर मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक आणि मतदाराचे नाव मतदान प्रतिनिधी व  दुसऱ्या मतदान अधिकाऱ्यास ऐकू जाईल एवढया मोठ्याने वाचून दाखवील. पुरुष मतदार असल्यास मतदार यादीच्या चिन्‍हांकित प्रतिमध्ये त्याच्या नावाखाली अधोरेखीत करेल. स्त्री मतदार असल्यास मतदाराच्या नावाखाली अधोरेखीत करुन मतदाराच्या नावाच्या डाव्या बाजूला बरोबरची (√) अशी खूण करेल.
            फोटो ओळखपत्र (एपिक) नसलेल्या मतदाराची ओळख पटविण्यासाठी आवश्यक इतर पुरावे
            1)आधार कार्ड 2) ड्रायव्हींग लायसन्स 3)आयकर ओळखपत्र (पॅनकार्ड ) 4)पासपोर्ट (पारपत्र) 5)केंद्र / राज्य शासकीय / निमशासकीय कर्मचारी / सार्वजनिक उपक्रम / स्थानिक स्वराज्य संस्था किंवा  औद्योगिक घराणे यांनी वितरीत केलेले सेवाचे ओळखपत्र 6)खासदार/विधान सभा सदस्य/विधान परिषद सदस्य यांना दिलेले शासकीय ओळखपत्र 7)संबंधित पदवीधर / शिक्षक मतदारसंघातील शिक्षण संस्‍थेत कार्यरत असलेल्या पदवीधर / शिक्षक मतदारांना वितरीत केलेले ओळखपत्र 8)विश्वविद्यालयाद्वारे वितरीत पदवी / पदविका मूळ प्रमाणपत्र 9)सक्षम प्राधिकरणाद्वारे वितरीत केलेले अपंगत्वाचे प्रमाणपत्र
          ज्या मतदारांना भारत निवडणूक आयोगाचे फोटो ओळखपत्र वाटप करण्यात आलेले आहे, त्‍यांनी भारत निवडणूक आयोगाचे ओळखपत्र मतदान केंद्रावर सादर करणे आवश्यक आहे. तथापि, असे ओळखपत्र सादर न करु शकणाऱ्या मतदारांनी वरीलपैकी एक पर्यायी फोटो ओळखपत्र त्यांची ओळख देण्‍यासाठी सादर करणे आवश्यक आहे. (भारत निवडणूक आयोगाच्‍या दि.10/11/2020 रोजीच्या पत्रात दिलेल्या निर्देशांप्रमाणे)
     पक्की शाई लावण्याची पद्धत
          मतदाराची ओळख पटविल्यानंतर पदवीधर मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या डाव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे हे पहिल्या मतदार अधिकाऱ्याचे प्रमुख काम राहील. (मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र राज्य यांच्‍या दि. 9 नोव्‍हेंबर 2020 रोजीच्या पत्राद्वारे दिलेल्या निर्देशांप्रमाणे)
           मतदारास डाव्या हातावर बोटे नसतील तर पदवीधर मतदारसंघाकरीता मतदाराच्या उजव्या हाताच्या तर्जनी आणि शिक्षक मतदारसंघातील मतदाराच्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाला पक्की शाई लावणे. पक्की शाई लावल्‍यानंतर पहिला मतदान अधिकारी मतदारास मतदान अधिकारी क्रमांक 2 यांच्‍याकडे जाण्यास सांगेल.
           दुसरा मतदान अधिकारी – दुसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे मतपत्रिकेचे गठ्ठे असतील. पदवीधर मतदारसंघासाठी पांढऱ्या रंगाची मतपत्रिका असेल तर शिक्षक मतदारसंघासाठी गुलाबी रंगाची मतपत्रिका असेल. पहिल्या मतदान अधिकाऱ्याने मोठ्याने वाचून दाखवलेला मतदाराचा मतदार यादीचा भाग क्रमांक व अनुक्रमांक मतपत्रिकेच्या स्थळ प्रतीवर नोंदवून घेईल. मतपत्रिका स्थळ प्रतिपासून वेगळी करुन मतदारास देईल आणि त्याला मतदान अधिकारी क्रमांक 3 यांच्याकडे जाण्यास सांगेल.  कोणत्याही मतदान प्रतिनिधीस मतपत्रिकेवरील अनुक्रमांकाची नोंद घेण्यास कायद्याने प्रतिबंध आहे. यामुळे मतदान प्रक्रियेचा भंग होतो.
           मतदारास मतपत्रिका देणे – मतदाराला मतपत्रिका मत नोंदविण्यासाठी देण्यापूर्वी मतपत्रिकेच्या पाठीमागे स्थळ प्रतिवर व मतपत्रिकेवर उजव्या कोपऱ्यात विभेदक चिन्ह उमटवून मतपत्रिकेवरील विभेदक चिन्हाच्या खाली केंद्राध्यक्ष स्वाक्षरी करील. मतदाराला मतपत्रिका देण्‍यापूर्वी संबंधित मतदान अधिकारी चिन्‍हांकित मतदार यादीतील मतदाराचा मतदार यादी भाग क्रमांक व अनुक्रमांक स्थळ प्रतीवर लिहील व त्यावर त्याची स्वाक्षरी घेईल.
           तिसरा मतदान अधिकारी –तिसऱ्या मतदान अधिकाऱ्याकडे जांभळ्या शाईचे स्केचपेन व ढकल पट्टी असेल. तिसरा मतदान अधिकारी मतदाराकडून मतपत्रिका घेईल व मतपत्रिकेच्या मागच्या बाजूस वरच्या बाजूला उजव्या कोपऱ्यावर उमटवलेले विभेदक चिन्ह स्पष्ट दिसेल अशी मतपत्रिकेची उभी घडी व नंतर आडवी घडी अशी दोन वेळा घडी करील. त्यानंतर मतपत्रिकेची घडी उलगडून मतदारास देईल व मत नोंदवल्यानंतर परत त्याचप्रमाणे घडी करण्यास मतदारास सांगेल.

संकलन
अमर वासनिक
न्यूज एडिटर
7774980491

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *