BREAKING NEWS:
महाराष्ट्र

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षांचे पद जाणार? सदस्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

Summary

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटातील माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांनी पद बचावासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपला मतदान करणार्‍या त्या सहा सदस्यांचे पद अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी […]

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते-पाटील यांच्या गटातील माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या सहा सदस्यांनी पद बचावासाठी दाखल केलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

त्यामुळे उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राष्ट्रवादीशी बंडखोरी करून भाजपला मतदान करणार्‍या त्या सहा सदस्यांचे पद अपात्र ठरविण्याचा निर्णय जिल्हाधिकारी घेणार आहेत.

गुरुवारी याबाबत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आल्यानंतर बळीरामकाका साठे व माळशिरस तालुक्यातील राष्ट्रवादीचे उत्तमराव जानकर यांनी जिल्हा परिषदेत पत्रकार परिषद घेतली.

यावेळी त्यांनी मोहिते-पाटील यांच्या गटातील सहा सदस्यांच्या पद बचावासाठी दाखल करण्यात आलेली याचिका न्यायमूर्ती खानविलकर यांनी फेटाळली असल्याची माहिती दिली.

सर्वोच्च न्यायालयाने मोहिते- पाटील यांच्या गटाची याचिका फेटाळून लावण्याबरोबरच उच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेल्या आदेशानुसार व्हीप आदेश डावलून मतदान करणार्‍या सदस्यांचे पद अपात्र ठरविण्याबाबत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घ्यावा, असेही आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत.

त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या आदेशानंतर लगेचच जि. प. अध्यक्ष अनिरुध्द कांबळे यांच्याविरुध्द अविश्वास ठराव जि.प. सभागृहात दाखल करण्यात येणार असल्याचे साठे यांनी पत्रकारांना सांगितले.

पक्षाचा आदेश मोडित काढल्याने राष्ट्रवादीतून यापूर्वीच बंडखोरी केलेले सदस्य शीतलादेवी मोहिते- पाटील, स्वरुपाराणी मोहिते-पाटील, अरुण तोडकर, गणेश पाटील, मंगल वाघमोडे व सुनंदा फुले या सदस्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे.

त्यांचे पद अपात्र ठरल्यानंतर याठिकाणी पुन्हा राष्ट्रवादीचे सदस्य निवडून येतील. जि.प. अध्यक्ष यांच्याविरुध्द अविश्वास ठराव दाखल केल्यानंतर जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता येईल, असाही विश्वास यावेळी साठे यांनी व्यक्त केला.

निवडणुकीत आता मोहिते-पाटील यांची निवडून येण्याची क्षमता उरली नाही. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत त्यांनी सांगितलेला लाखाचा लीड आता बारा हजारांवर आला असल्याचा टोलाही यावेळी उत्तमराव जानकर यांनी मोहिते-पाटील यांनी लगावला.

पद अपात्र ठरल्याचा आदेश नाही : कांबळे

राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे यांनी काय माहिती दिली आहे याची मला माहिती नाही. सर्वोच्च न्यायालयाने नेमका काय निकाल दिला याचीही माहिती घेत आहे.

मात्र, तूर्त तरी जिल्हा परिषदेच्या कोणत्याही सदस्यांचे पद अपात्र ठरले नाही. त्यामुळे अविश्वास ठराव दाखल होतोच कसा? असा प्रतिप्रश्न जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी उपस्थित केला.

याबाबत जि.प. अध्यक्ष कांबळे यांच्या दालनात सायंकाळी उशिरापर्यंत भाजप पदाधिकार्‍यांची चर्चा सुरू होती. जिल्हाधिकारी यांच्याकडून नेमका निर्णय काय येणार, याबाबत चर्चा सुरू होती.

सचिन सावंत मंगळवेढा
9370342750

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *