जिल्हा परिषद शिक्षक रणजितसिंह डिसले यांना युनेस्को – वार्की फाउंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले अभिनंदन
मुंबई, दि. ३ : सोलापूर जिल्हा परिषदेतील प्राथमिक शिक्षक श्री. रणजितसिंह डिसले यांना युनेस्को-वार्की फाऊंडेशनचा जागतिक शिक्षक पुरस्कार (ग्लोबल टिचर प्राईज) जाहीर झाला आहे. याबद्दल राज्याचे ग्रामविकास मंत्री श्री. हसन मुश्रीफ यांनी श्री. डिसले यांचे अभिनंदन केले आहे. यापुढील काळातही असेच उत्तुंग कार्य करुन राज्यातील इतर शिक्षकांना आपण प्रेरणा देत रहाल असे सांगून त्यांनी श्री. डिसले यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
१४० देशातील १२ हजारांहून अधिक शिक्षकांच्या नामांकनातून श्री. डिसले यांना हा पुरस्कार मिळाला. हे निश्चितच गौरवास्पद व कौतुकास्पद आहे. ७ कोटी रुपयांच्या या पुरस्कारामधून ५० टक्के रक्कम ही अंतिम फेरीमधील ९ शिक्षकांना देण्याचे श्री. डिसले यांनी जाहीर केले आहे हे निश्चितच अभिनंदनीय आहे, असे गौरवोद्गार मंत्री श्री. मुश्रीफ यांनी काढले.